शिवसेना, भाजप युतीचं जमलं बरं का; उद्धव ठाकरे, अमित शाह उद्या अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
Shiv Sena, BJP alliance Finally formed | (Photo credit: archived, edited, representative image)

Shiv Sena, BJP alliance Finally formed: अत्यंत टोकाच्या उत्सुकतेनंतर अखेर शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) युतीबाबतचा संभ्रम दूर होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना भाजप युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, लवकर म्हणजे उद्याच (18 फेब्रुवारी) त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार युतीची घोषणा संयुक्तरित्या करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) हे बीकेसी (BKC) येथे सोमवारी (18 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता संयुक्त पत्रकार परिषद (Joint Press Conference) घेऊन युतीबाबत अधिकृत घोषणा करतील, असे वृत्त आहे. लोकमत डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, युसीसाठी आपण इच्छुक आहोत पण, लाचार नसल्याचे जाहीर विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होत. मात्र, युतीची बोलणी करायची असल्यास येत्या 48 तासात करावीत. अन्यथा शिवसेना कोणाची वाट पाहणार नाही. शिवसेनेचा निर्णय झाला आहे, असे अल्टिमेटम शिवसेनेने भाजपला दिले होते. त्यानंतर भाजपच्या गोटात वेगाने चक्रे फिरली आणि मुख्यमंत्री वासी दौरा तब्बेतीच्या कारणामुळे अर्धवट सोडून मुंबईला परतले. त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे निवसस्थान गाठले. या दोन्ही नेत्यांनी युतीबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. या चर्चेला शिवसेनेकडून शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व भाजपाकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीतील चर्चेच्या तपशीलाबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. (हेही वाचा, लोकसभा निवडणूक 2019: प्रकाश आंबेडकर यांच्याकडून बहुजन वंचित आघाडीचे 4 उमेदवार घोषीत, बी जी कोळसे-पाटील निवडणुकीच्या मैदानात)

दरम्यान, उभय पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या युतीद्वारेच लढवाव्यात असा निर्णय घेतला. तसेच, युतीचा फॉर्म्युलाही नक्की केल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार लोकसभेसाठी दोन्ही पक्ष फिप्टी फिप्टी म्हणजेच प्रत्येकी 24-24 जागा लढणार असल्याचे समजते. तर, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना 143 तर, भाजप 145 जागा लढेल. तसेच, भाजपने लोकसभेची पालघरची जागाही शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी दर्शवली असून, शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या मागण्याही भाजपने मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, युती होण्याबाबत सर्व निर्णय जवळपास पूर्ण झाले असले तरी, राजकारणाच्या मैदानात केव्हाही काहीही होऊ शकते. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते संयुक्तरित्या जाहीर घोषणा करत नाहीत तोपर्यंत तरी युतीबाबत संभ्रम कायम राहणार आहे हे नक्की.