आजच्याच दिवशी गांधींची हत्या करणाऱ्या 'नथुराम गोडसे'ला झाली होती फाशी; जाणून घ्या काय होती त्याची शेवटची इच्छा
नथुराम गोडसे (संग्रहित संपादित प्रतिमा)

30 जानेवारी 1948 या काळ्या दिवशी विवेकबुद्धी गमावलेल्या, नथुराम गोडसेने (Nathuram Godse) शांतता समर्थक, अहिंसावादी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हत्येनंतर तो पळून गेला नाही, तर त्याने आत्मसमर्पण केले. दीड वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या हत्येच्या चौकशीनंतर मारेकरी नथुराम गोडसे याला 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशी देण्यात आली. नथूरामला अंबाला तुरूंगात फाशी देण्यात आली. वधस्तंभावर फाशी दिल्यानंतर त्याचे पार्थिव कुटूंबांच्या ताब्यात देण्यात आले नाही. तुरुंगातच छुप्या पद्धतीने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यावेळी त्याला फाशी देण्यात येणार होती, त्यावेळी त्याच्या हातात भगवा ध्वज आणि एका हातात अखंड भारताचा नकाशा होता. मृत्यूच्या आधी त्याने 'नमस्ते सदा वत्सळे' असे उच्चारण केले होते.

फाशी देण्यापूर्वी, नथुराम गोडसेने आपले मृत्युपत्र तयार केले होते. ज्यात त्याने आपला भाऊ दत्तात्रेय गोडसे आणि त्याची पत्नी यांना विम्याचे पैसे मिळावेत असे लिहिले होते. नथुराम गोडसे याने आपल्या अंत्यसंस्काराचा हक्क आपल्या भावाला दिला होता. यासह नथुरामने आपली शेवटची इच्छाही लिहून ठेवली. आपल्या पार्थिवाची राख सिंधू नदीत वाहिली जावी ही त्याची शेवटची इच्छा होती. मात्र तत्कालीन परिस्थिती पाहता त्याची ही शेवटची इच्छा पूर्ण झाली असावी यात शंका आहे.

महात्मा गांधींवर झालेल्या गोळीबारानंतर नथूराम गोडसे तुरूंगात असताना त्याचा मुलगा देवदास, त्याला भेटायला गेला होता. या घटनेचा उल्लेख नथुरामचा भाऊ आणि सह-आरोपी गोपाळ गोडसे यांनी या 'गांधींचा वाढ का केला?’ या आपल्या पुस्तकात केला आहे. या भेटीमध्ये नथुरामने आपण गांधींची हत्या राजनैतिक कारणामुळे केली असे देवदासला सांगितले होते. (हेही वाचा: नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी: कमल हासन)

नथुराम विनायक गोडसे याचा जन्म 19 मे  1910 रोजी पुण्याजवळील बारामतीमध्ये एका मराठी चित्पावन कुटुंबात झाला होता. सुरुवातीला त्याने गांधींच्या विचारांना पाठिंबा दर्शविला, परंतु नंतर त्याने गांधींवर हिंदूंविरूद्ध भेदभावाचे धोरण अवलंबिले असल्याचा आरोप केला, हाच राग पुढे वाढत जावून त्याने गांधींची हत्या केली.