'स्वतंत्रते न बघवते...!', राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्र हल्ला; प्रजासत्ताक धोक्यात असल्याचा इशारा
Raj Thackeray slams Pm Narendra Modi through the cartoon on 70th Republic Day | (Image courtesy: Twitter, Edit Image)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray ) हे राजकीय नेते असले तरी ते मुळात व्यंगचित्रकार (Cartoonist Raj Thackeray) आहेत. आपल्या व्यंगचित्रातून ते नेहमीच सरकार आणि विरोधकांवर प्रहार करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार हे तर त्यांच्या व्यंगचित्रातील जणू खास मॉडेल. पंतप्रधान मोदी यांच्यावर तर त्यांनी नेहमीच प्रहार केला आहे. 70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तही (70th Republic Day) त्यांनी एक खास व्यंगचित्र (Cartoon) रेखाटले आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, हे व्यंगचित्र काहीसे अधिकच तीव्र भाष्य करणारे आणि तितकेच टोकदार असल्याने यातून वाद निर्माण होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून राज यांनी हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. त्यावर लाईक आणि कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे. तर, अनेकांनी हे व्यंगचित्र शेअरही केले आहे.

'स्वतंत्रते न बघवते...!' या शिर्षकाखाली रेखाटलेल्या या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह (BJP Chief Amit Shah) यांच्यावर तीव्र स्वरुपाची टीका करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या दोन व्यक्तिरेखा लाल किल्ल्याच्या प्रतिकृतिवर आहेत. हे दोघे (व्यंगचित्रातील व्यक्तिरेखा) लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन भारतीय प्रजासत्ताकालाच धक्का लावताना दिसत आहेत. देशातील लोकशाही धोक्यात आहे. तिला धोक्यात घालण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. त्यासाठी लोकशाही मार्गाने मिळालेल्या पद आणि कायद्याचाच विपर्यास केला जात आहे. त्यामुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. लोकशाहीवर काळाचा काळोखाची छाया दाटल्याचा चित्र, असल्याची भावनाच या व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा बहुदा राज ठाकरे यांचा विचार असावा. (हेही वाचा, 'म्हणून मी जनतेला छळतोय!' व्यंगचित्रातून राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात)

या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह एकमेकांच्या संगनमताने मिळून प्रजासत्ताकाला फाशी देताना दाखवले आहे. जणू काही भारतमाताच फासावजर जात आहे, असे या चित्रातून भासवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चित्रावरुन कदाचित वाद निर्माण होऊ शकतो. दरम्यान, राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य करणारे हे पहिलेच व्यंगचित्र नाही. यापूर्वीही राज यांनी अनेकदा व्यंगचित्र रेखाटून मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर व्यंगचित्रकार राजकारणी असलेले राज ठाकरे हे बहुदा पहिलेच राजकीय नेते असावेत.