'म्हणून मी जनतेला छळतोय!' व्यंगचित्रातून राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात
RajThackeray Cartoon (Photo Credit: Twitter)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा आपले व्यंगचित्राचे हत्यार उपसले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राज ठाकरे सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा राज यांनी मोदी भारतीय जनतेचा छळ करत असल्याची टीका व्यंगचित्रातून केली आहे. (राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रातून मोदींच्या 'नव्या थापा' यांची पंतंगबाजी)

या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी मोदींची भलमोठी प्रतिमा दाखवली असून भारतीय जनतेच्या रुपात एक किरकोळ व्यक्ती दाखवली आहे. या व्यक्तीला दोन बोटात उचलत, म्हणून मी तुला छळतोय! असे मोदी म्हणत आहेत. हे बोलके व्यंगचित्र राज यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.

मोदींच्या वक्तव्यावर आधारित व्यंगचित्र

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात देशाची 2004 ते 2014 ही वर्षे वाया गेली. भ्रष्टाचारासाठी अशक्त सरकार काँग्रेसला हवे असते, असा टोलाही त्यांनी लगावला. गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने माझा छळ केला, माझ्यावर विनाकारण आरोप केले, असे मोदी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून निशाणा साधला.