मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) उद्या मुंबईत (Mumbai)मोर्चा निघणार आहे. यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी केली जात आहे. गिरगाव ते आझाद मैदानापर्यंत असा मोर्चा निघणार आहे. यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. केवळ मुंबईतून नव्हेतर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि शहरातून मनसे कार्यकर्ते आपली उपस्थिती दाखवणार आहेत. एवढेच नव्हे तर, तब्बल 2 लाख मनसैनिक या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आपत्कालीन सुविधांचे नियोजनही करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच 23 जानेवारी रोजी पक्षाच्या झेंड्यासह आपल्या विचारधारेतही मोठा बदल केला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात आवाज उठवला आहे. या पाश्वभूमीवर मनसेचा 9 मार्च रोजी मोर्चा निघणार असून यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक आणि राज्यभरातल्या इतर प्रमुख शहरात मनसेची जय्यत तयारी सुरू आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसे कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनतेना पत्रके वाटत आहेत. तसेच मुंबईतल्या नाक्यानाक्यावर मनसेचे पोस्टर लावण्यात आले आहेत. मनसे मोर्चासाठी भगव्या आणि काळ्या रंगाचे टी-शर्ट छापण्यात आले आहे. पदधिकाऱ्यांसाठी कुर्तेही तयार करण्यात आले आहेत. रिस्ट बॅंडही तयार करण्यात आले आहे. उद्याचा मोर्चा आकर्षित ठरणार आहे. कारण उद्याच्या मोर्चात मनसैनिकांच्या डोक्यावर भगव्या रंगाची गांधी टोपी दिसणार आहे. या टोपीवर मनसेची निशाणी आणि शिवराजमुद्रा दिसणार आहे, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे.  हे देखील वाचा-हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेकडून शिवसेनेची कोंडी, मातोश्री बाहेर झळकावले पोस्टर

याधीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढला होता. मनसेचा मोर्चा दुपारी 12 वाजता हिंदू जिमखान्यापासून सुरू होणार आहे. मनसेच्या या नव्या भुमिकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. नुकतीच शिवसेना खासदार आणि सामना संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखात घेतली होती. यावेळी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलावेच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहात का? असा पश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, घुसखोरांना हाकला ही भुमिका बाळासाहेबांनी गेल्या अनेक वर्षापूर्वी सर्वांसमोर मांडली होती. यामुळे आम्ही आमच्या भुमिकेवर ठाम आहोत. तसेच कोणीही याचे श्रेय घेऊ नये, असे विधान करत उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे