हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेकडून शिवसेनेची कोंडी, मातोश्री बाहेर झळकावले पोस्टर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Photo Credits-Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. त्यावरुन विरोधी पक्ष भाजपने उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. खासकरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा याच्या विरोधात संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता मनसे (MNS) कडून वांद्रे मधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या बाहेर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरमधून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे पोस्टर मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी झळकावले आहे. तसेच पोस्टर मधून पाकिस्तानी आणि बांग्लादेशी नागरिकांवर सुद्धा निशाणा साधला आहे.

मातोश्री बाहेर झळकावण्यात आलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना भारतामधून हकलावून लावावे असे लिहिण्यात आले आहे. हिच आपली भुमिका असेल तर प्रथम वांद्रे येथील अंगणातील घुसखोरांनी भरलेली मोहल्ले साफ करावे अशी विनंती पोस्टर मधून करण्यात आले आहे. एवढेच नाही तर पोस्टर मधून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्याचा ही प्रयत्न करण्यात आला आहे. पोस्टर मधून कोणतेही आवाहन करण्यात आले नसून फक्त विनंती करत असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(मनसे महामोर्चाचे टिझर झळकले; पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना दिला इशारा)

तर मनसेने काही दिवसांपूर्वी त्यांच्या झेंड्यात बदल करत आगामी काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावक राजकरण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्याने पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात राज ठाकरे यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. तर येत्या 9 फेब्रुवारीला मनसेचा याच मुद्द्यावरुन मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा आझाद मैदान ते मरिन लाईन्स मार्गाने असणार आहे. मनसेने काही दिवसांपूर्वी वर्सोवा भागामध्ये असलेल्या बांगलादेशांनी आपल्या देशात निघून जाण्याचा इशारा दिला होता. यासाठी वर्सोव्हा भागात पोस्टरही लावण्यात आले होते. याशिवाय पनवेल परिसरातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकत्वल दुरूस्ती कायदा विरोधात पोस्टरबाजी केली होती.