Manohar Parrikar - The common man in Indian politics: भारतीय राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणूनच मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांच्याकडे पाहावे लागते. त्यांच्या जीवनातील अखेरचे काही महिने अपवाद म्हणून सोडल्यास त्यांचे व्यक्तिमत्व हे नेहमीच समोरच्यावर छाप पाडणारे राहिले आहे. पर्रिकर हे भारतीय राजकीय नेते असे कधी वाटलेच नाहीत. खास करुन त्यांच्या पिढिच्या नेत्यांमध्ये. स्थूल शरीर, पुढे आलेले पोट आणि चेहऱ्यावर सतत एक डावपेची आणि मग्रूर भाव हेच भारतीय राजकाऱ्यांचे व्यक्तिमत्व राहिले आहे. अपवाद वगळता आजही अशीच स्थिती आहे. त्या तुलनेत पर्रिकर हे नेहमीच भारदस्त आणि तंदुरुस्त असे प्रभावी व्यक्तिमत्व राहिले आहे. असामान्य पदाला पोहोचूनही त्यांनी आपले सामान्यत्व कधी सोडले नाही. विधानसभेच्या 40 आणि लोकसभेच्या अवघ्या 2 जागा असलेल्या गोवा (Goa) राज्यातून त्यांनी राजकीय श्रीगणेशा केला. या राज्याचे ते मुख्यमंत्री (Chief Minister) बनले. 2014 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) प्रणीत भाजप (BJP) सरकार सत्तेत आल्यावर केंद्रीय नेतृत्वाने त्यांना दिल्लीला बोलवून संरक्षण मंत्री पद (Defense Minister ) दिले. ही सुद्धा पर्रिकर यांच्या कामाची, व्यक्तिमत्वाची आणि व्यासंगाचीच पोचपावती. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणूक निकालानंतर निर्माण झाली त्रीशंकू स्थिती आणि सत्तास्थापनेसाठी भाजपसमोर निर्माण झालेला राजकीय पेच आदीमुळे ते पुन्हा गोव्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळतानाच कर्करोगाने त्यांचे निधन झाले. मनोहर पर्रिकर यांचा राजकीय प्रवास आणि व्यक्तिमत्वाविषयी
आरएसएसचा विश्वास सार्थ ठरवत गोव्यात भाजपला सत्ता
गोवा राज्यात १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे पर्रिकरांचा जन्म झाला. गोव्यातीलच लोयोला हायस्कूल मडगाव येथे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण झाले. मुंबई आयआयटीचे 1998च्या बॅचचे ते अभियांत्रिकी विषयाचे पदवीधर आहेत. त्यांच्या शिक्षणामुळे ते भारतीय राजकारणातील उच्चपदविधर म्हणून ओळखले जात. ते धातू अभियांत्रिकी विषयाचेही पदवीधर होते. शिक्षण सुरु असतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या संघटनेच्या संपर्कात आले. त्यांनी गोवा येथून आरएसएसचे काम सुरु केले. तेथे ते मुख्य शिक्षक म्हणून काम पाहात. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी संघटक म्हणून काम पाहिले होते. दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा त्या काळात गोव्यात प्रभावी होता. या पक्षाला टक्कर देण्यासाठी आरएसएसने त्यांना भाजपत आणले. नजीकच्या काळात पर्रिकरांनी आरएसएसचा विश्वास सार्थ ठरवत गोव्यात भाजपला सत्ता मिळवून दिली आणि स्वत: मुख्यमंत्री झाले. (हेही वाचा, मनोहर पर्रीकर यांचा बळी घेणारा 'स्वादुपिंडाचा कॅन्सर' World’s Toughest Cancer म्हणून ओळखला जातो, या कॅन्सरमध्ये रुग्ण बचावण्याची शक्यता अत्यल्प का असते?)
साधी राहणी प्रभावी व्यक्तिमत्व
अत्यंत साधी राहणी म्हणून पर्रिकर गोव्यात प्रसिद्ध होते. काळी पँट आणि पांढरा शर्ट हा पर्रिकरांचा आवडता पेहराव. मोठ्या पदावर असूनही पर्रिकरांना कधी सुटा-बूटातील पेहरावाचे आकर्षण वाटले नाही. अपवाद वगळता त्यांनी कधीही कोट किंवा फॅन्सी पेहराव केला नाही. गोव्यामध्ये ते स्कुटरने फिरत. सर्वसामान्य लोकांना भेटायला ही ते स्कुटरनेच जात. इतकेच नव्हे तर, आपल्या नेहमीच्या कामासाठी सार्वजनिक ठिकाणी गेल्यास तेथेही ते रांगेत उभे राहात. त्यांची ही सधी राहणी लोकांना आवडत असे. आपल्या कृती आणि व्यक्तिमत्वातून ते समोरच्यावर छाप टाकण्यात यशस्वी होत असत. मराठी, कोंकणी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे चांगले प्रभूत्व होते. जाहीर सभांमधून या भाषांच्या माध्यमातून समुदयासोबत ते नेहमीच संवाद साधत.
मनोहर पर्रिकर यांचा राजकीय प्रवास
- 1994 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून गोवा विधानसभेत प्रवेश
- 1999 मध्ये गोवा विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून निवड
- २४ ऑक्टोबर २००० ते २७ फेब्रुवारी २००२ या कालावधीत पहिल्यांदा अल्पकाळ मुख्यमंत्री
- ५ जून २००२ रोजी पुन्हा संधी मिळाल्याने सत्तेत. मुख्यमंत्री. २९ जानेवारी २००५ रोजी पर्रिकर सरकार पुन्हा अल्पमतात. सत्ताबदल.
- मार्च २०१२ मध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि भाजप व मित्र पक्षांनी २४ जागा जिंकल्या. पुन्हा एकदा पर्रिकर मुख्यमंत्री.
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश. गोव्यातील दोन्हीही जागा भाजपने जिंकल्या.
- 2014 मधील सार्वत्रीक यशानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पर्रिकरांना दिल्लीचे निमंत्रण. मात्र, पर्रिकर गोव्यात रमलेले.
- अखेर पंतप्रधान मोदी यांनी समजूत काढल्यावर मनोहर पर्रिकर दिल्लीला. संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी.
- पणजी विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले पर्रिकर उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले. मंत्री झाले.
- पर्रिकरांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यावर लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी.
- १४ मार्च २०१७ रोजी मनोहर पर्रिकर पुन्हा एकादा गोव्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान.
- भूमिका तेव्हा गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी घेतली होती.
- २०१४ ते २०१७ या कालावधीत पर्रिकर यांनी पर्रिकर यांनी संरक्षण मंत्री पदाचा कार्यकाळ सांभाळला.
पर्रिकर यांचे वैवाहीक जीवन
मनोहर पर्रिकर यांच्या मेधा यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांच्या पत्नी मेधा यांचेही 2001 मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. उत्पल आणि अभिजात त्यांना दोन पुत्र आहेत. कर्करोगासारखा दूर्धर आजार होऊनही पर्रिकरांनी हार मानली नाही. अखेरपर्यंत ते त्याच्यासोबत लढत राहिले. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते मुख्यमंत्रिपदावर कायम राहिले. अत्यंत कृष झालेल्या शरीराने ते जेव्हा जनतेसमोर जात तेव्हा त्यांची प्रकृती पाहून अनेकांना चटका लागत असते. त्यांच्या जाण्याने एक सर्वसामान्य माणूस ते प्रभावी राजकारणी आणि संघर्षशील व्यक्तिमत्व हरवले.