मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची स्वादुपिंडाच्या कॅन्सर (Pancreatic Cancer) सोबतची अपयशी झुंज 17 मार्च दिवशी अखेर संपली. गोव्यामध्ये रविवारी संध्याकाळी मनोहर पर्रीकर यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून अमेरिका, दिल्ली, मुंबई येथे मनोहर पर्रीकर यांच्या कॅन्सरवर उपचार करण्यात आले. मात्र स्वादुपिंडाचा कॅन्सर हा जगातील अत्यंत गंभीर कॅन्सरपैकी एक समजला जातो. वर्षभर मनोहर पर्रीकरांनी कॅन्सरला लढा दिला. या कॅन्सरवर उपचार करणं कठीण असल्याने स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर पूर्णपणे मात करून बाहेर पडणं क्वचितच रुग्णाला शक्य असतं. मुळातच कोणत्याही कॅन्सरवर मात करण्यासाठी त्याचं वेळीच निदान होणं गरजेचं आहे. त्यामध्ये स्वादुपिंडाच्या कॅन्सर बाबत मात्र रुग्णांनी विशेष दक्षता पाळणं गरजेचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली, साध्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारे आश्वासक नेतृत्त्व हरपले.. अशी व्यक्त केली भावना
स्वादुपिंडाच्या कॅन्सरबाबत खास गोष्टी
- स्वादुपिंडाचा कॅन्सर हा world’s toughest cancer म्हणून ओळखला जातो. Advanced pancreatic cancer मध्ये रुग्ण त्यावर मात करून बाहेर पडण्याची शक्यता फारच कमी असते. जगभरात स्वादुपिंडाच्या कॅन्सर वर या टप्प्यात आलेल्या रुग्णांपैकी केवळ 3-5% रुग्ण 5 हून अधिक काळ जगू शकले आहेत.
- स्वादुपिंड हे पोटाचा भाग आणि पाठीचा कणा यामध्ये असणारा एक अवयव आहे. जेव्हा स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये पेशींची अनियमित वाढ होते तेव्हा तो शरीरात पसरायला सुरुवात होते. मात्र स्वादुपिंड हे पोटाच्या आतील भागाजवळ असल्याने कॅन्सरचं निदान हे तो गंभीर टप्प्यावर पोहचल्यावरच होते.
- स्वादुपिंडाच्या कॅन्सर जडण्यामागील नेमकं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. ५-१०% रुग्णांमध्ये स्वादुपिंडाचा कॅन्सर हा अनुवांशिक असतो. सामान्यपणे दिसण्यात आलेल्या लक्षणांनुसार दीर्घकाळ मधुमेहाशी सामना करणाऱ्यांमध्ये, लठ्ठपणा, धूम्रपानाचे व्यसन असणाऱ्यांना स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका अधिक असतो.
- पोटाच्या आतल्या बाजूमध्ये स्वादुपिंड असल्याने त्याची गाठ वाढत असली तरीही फिजिकल टेस्टमध्ये डॉक्टर किंवा रुग्णाच्या हाताला त्याचा स्पर्श होऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यावर स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं निदान होणं विरळ असतं. लक्षणांवरून अनेक वैद्यकीय चाचण्या केल्यानंतरच त्यांचं अचूक निदान शक्य असते. परिणामी स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका हा गंभीर स्वरूप धारण केल्यावरच लक्षात येतो.
- स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये शस्त्रक्रिया करून नियंत्रण मिळवता येऊ शकते पण प्रामुख्याने हा कॅन्सर गंभीर टप्प्यावर लक्षात आल्याने शस्त्रक्रिया करणं कठीण असते. स्वादुपिंडाच्या ट्युमर भोवती स्ट्रोमा (stroma) चं जाळं असतं. स्ट्रोमा म्हणजे पेशी आणि रक्तवाहिन्या यांचं जाळं. त्यामुळे ट्युमर पर्यंत पोहचणं कठीण होतं. सध्या संशोधक या स्ट्रोमाला धक्का न लावता ट्युमर पर्यंत पोहचण्यासाठी संशोधन करत आहेत. काही कॅन्सरमध्ये targeted therapies च्या मदतीने केवळ गाठीवर थेट हल्ला करता येतो पण स्वादुपिंडाच्या कॅन्सरची गाठ त्याला अपवाद आहे. परिणामी स्वादुपिंडाच्या कॅन्सर वर उपचार करणं कठीण आहे.
प्रगत तंत्रज्ञान, वैद्यशास्त्र यांची सांगड घालत आता स्वादुपिंडाचा कॅन्सर वेळीच कसा ओळखता येईल यावर अधिक संशोधन सुरु आहे. मात्र तोपर्यंत कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आटोक्यात ठेवायचं असल्यास प्रत्येकाला शरीराकडून मिळणारे संकेत ओळखून वेळीच वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.
( महत्त्वाची सूचना: वरील माहिती ही केवळ आजाराबद्दल सजगता निर्माण करण्यासाठी आहे. त्याला वैद्यकीय सल्ला समजू नये. कोणत्याही आजाराचं निदान करण्यासाठी तज्ञांची मदत / सल्ला याने उपचार निवडणं हितावह आहे.)