Lok Sabha Elections 2019: प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा अद्याप झाली नसली तरी, गुजरात (Gujara) राज्यातील सूरत (Surat ) येथील कपडा व्यापारी (Textile Traders) मात्र आतापासूनच प्रचाराला लागले आहेत. हे कपडा व्यापारी पंतप्रधान मोदींचे समर्थक (Pm Modi Supporter) आहेत. त्यांनी मोदींच्या प्रचारासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या व्यापाऱ्यांनी आपल्या पेमेंट बिलावर (Invoice) पंतप्रधान मोदींचा फोटो छापला आहे. तसेच, माल पॅकींगसाठी वापरण्यात येणाऱ्या रिबीनवरतीही मोदींची छबी झळकवली आहे. आपल्याला माहिती असेलच सूरतचे कपडे संपूर्ण उत्तर भारत आणि बंगालसह दक्षिण भारतातही लोकप्रिय आहेत. त्यामुळे हे व्यापारी आपल्या आवडत्या नेत्यांचा फोटो इनवाईसवर छापून त्यांना प्रसिद्धी देताना दिसत आहे. अर्थात, त्यांची ही कल्पना ग्राहकांना किती आवडेल हे माहिती नाही, पण, सोशल मीडियावर तरी या इनवाइसचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.
सूरत येथील भाजप आमदार हर्ष सिंघवी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्यापाऱ्यांच्या या कल्पनेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी एका इनवाइसचा फोटो पोस्ट करत ट्विटमध्ये म्हटले आहे, 'हे एकदम स्पष्ट आणि कौतुकास्पद आहे! सूरत टेक्सटाइल ट्रेडर्स किती प्रेमाने मोदींना 2019 मध्ये दुसऱ्यांदा निवडू इच्छितात.' दरम्यान, सिंघवी यांनी ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक पेमेंट इनवाइस आहे. ज्यावर मोदींची प्रतिमा छापण्यात आली आहे आणि त्यावर 'नमो अगेन' असेही लिहिले आहे. हे परी इम्पॅक्स नावाच्या कंपनीचे इनवाइस आहे. त्याचा बिल अकाऊंट 1.06 लाख रुपये आहे. बिलावर स्वच्छ भारत मिशनचा लोगोही पाहायला मिळतो.
दरम्यान, सिंघवी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या दुसरा फोटो हा पॅक करण्यात आलेल्या मालाच्या गोणीचा आहे. यात गोण पॅक करण्यात आलेल्या रिबिनीवरही मोदींचा प्रचार पाहायला मिळतो. या रिबिनीवर 'वोट फॉर मोदीजी मिशन 2019' असे लिहिण्यात आले आहे. सूरतच्या व्यापाऱ्यांची अशी कल्पना आहे की, हा माल देशभरात वितरीत होणार आहे. त्यामुळे मालासोबतच मोदींचा प्रचारही केला जाणार आहे. (हेही वाचा, विरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात? हरियाणा राज्यातून भाजपसाठी करणार बॅटींग?)
So Clear & Thoughtful !
This is how Surat Textile Traders want @narendramodi ji Again in 2019. pic.twitter.com/ur4SY16Ez4
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) February 5, 2019
कपडा व्यापाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराची ही पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. केंद्रातील भाजप सरकारने लागू केलेल्या जीएसटीनंतर देशभरातील व्यापारी आणि उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या नाराजीचा फटका गुजारतमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला बसला होता. या निवडणुकीत भाजपा जवळपास पराभवाच्या छायेत गेले होते. मात्र, सूरतने सहकार्य केल्याने गुजरातमध्ये भाजपचा निसटता विजय होऊ शकला.