Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या रांगड्या भाषाशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणातून त्यांच्या हटके भाषाशैलीचा हटके अंदाज पाहायला मिळतो. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला या वेळीही या शैलीचे दर्शन उपस्थितांना घडले. सभा सुरु असताना काही कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. सुरुवातीला अजित पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, कार्यकर्त्यांचा आवाज अधिक वाढू लागल्याने अजित पवार चांगलेच संतापले. आता शांत बसा. ही घोषणाबाजी अशीच सुरु राहिली तर, तिकीटच कापतो बघा एकेकाचं अशा मिश्कील अंदाजात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना समज दिली. हे कार्यकर्ते शिरुर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha constituency) तिकीटासाठी लॉबिंग करत होते.
भाषण सुरु असताना काही कार्यकर्ते माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाने घोषणाबाजी करत होते. उपस्थित नेत्यांनी अनेकदा सांगूनही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले. ते म्हणाले, आता इथं बेंबीच्या देटापासून ओरडत आहात. पण जेव्हा तिकीट दिलं तेव्हा तुम्ही काय केलं? 2009 मध्ये तिकिट दिलं होतं ना? आता शांत बसा, असे म्हणत अजित पवार यांनी दरडावताच कार्यकर्ते शांत झाले. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघात पक्ष देईल तोच राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. त्यामुळे पक्ष जो उमेदवार देईल तो उमेदवार निवडून आणावा लागेल, असे अजित पवार यांनी सांगितले. या वेळी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालले डॉ. अमोल कोल्हेही व्यासपिठावर उपस्थित होते. (हेही वाचा, मंत्री चंद्रकांत पाटील यांना अजित पवार यांचं खुलं आव्हान म्हणाले 'हिंमत असेल तर माढ्यातून लढाच')
दरम्यान, पक्षात नव्यानेच दाखल झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाने कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी हासुद्धा त्यातलाच एक भाग असल्याची उपस्थितांमध्ये चर्चा सुरु होती. विलास लांडे यांच्या नावाने कार्यकर्ते घोषणा देत होते तेव्हा स्वत: विलास लांडे हेसुद्धा तिथे उपस्थी होते आणि ते कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे अवाहन करत होते. मात्र कार्यकर्ते घोषणा देतच होते. दरम्यान, अजित पवार यांनी सज्जड दम भरताच कार्यकर्ते शांत झाले.