
मुंबई मध्ये आज इंडिया आघाडी (INDIA) आणि महायुती अशा दोघांच्याही बैठका होणार आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. त्यासाठी देशाच्या विविध राज्यातून नेते मंडळी मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. आज आणि उद्या मुंबई मध्ये इंडिया आघाडीची बैठक ग्रॅन्ड हयात मध्ये आयोजित करण्यात आली आहे तर महायुतीची बैठक वरळी मध्ये होत आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत देशातील 28 पक्षांचे नेते सहभागी होणार आहे. मराठमोळ्या अंदाजात त्यांचे स्वागत होणार आहे. संध्याकाळी नेत्यांच्या स्वागताला पार्लेश्वर ढोल पथक मुलींची लेझीम पथक असणार आहे. पाहुणचारामध्येही मराठमोळ्या खाद्य पदार्थांची रेलचेल असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या बैठकीमध्ये आज संध्याकाळी इंडिया आघाडीचा लोगो जारी केला जाणार आहे. 28 पक्षांचे 63 प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसीय बैठक असणार आहे. ममता बॅनर्जी कालच मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे कुटुंबाची भेट घेत त्यांच्यासोबत रक्षाबंधनही साजरं केलं. तर बीग बींच्या घरी देखील जाऊन बच्चन कुटुंबियांंची भेट घेतली.
इंडिया आघाडी प्रमाणेच महायुतीच्या नेत्यांची देखील बैठक होणार आहे. आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भोजन कार्यक्रम व चर्चा आयोजित करण्यात आली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह आरपीआय (आठवले गट), आरपीआय (जोगेंद्र कवाडे गट), बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, जन सुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. हे सर्व घटक पक्ष या बैठकांना उपस्थित राहणार आहेत.
वरळी च्या डोम मध्ये महायुतीची बैठक असणार आहे. या बैठकीत महायुती मधील पक्ष राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहेत.