एक दोन नव्हे तर, तब्बल पंधरा वर्षानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये सत्तावापसी केली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. तर, प्रदीर्घ काळानंतर सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्री म्हणून मध्य प्रदेशची धुरा कोणात्या खांद्यावर दिली जाणार याबाबत उत्सुकता होती. अखेर काँग्रेस नेतृत्वाने कमलनाथ (Kamal Nath)यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. कमलनाथ हे गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे समजले जातात. कमलनाथ यांनीही अनेक संधी असूनही गांधी परिवाराची साथ कधी सोडली नाही. कदाचित त्याचेच फळ म्हणून कमलनाथ यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली असवी. कमलनाथ यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज (सोमवार, 17 डिसेंबर ) शपथ घेतली. या वेळी काँग्रेसकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आले. संपूर्ण भोपाळभर काँग्रेसने पोस्टर्स झळकावली होती. दरम्यान, या सर्व पोस्टर्सपैकी काही पोस्टर्स मात्र भोपाळवासीय आणि कमलनाथ यांच्या शपथविधीसाठी अलेल्या मान्यवराचे लक्ष वेधून घेत होती. या पोस्टरवरील तीन चेहरे हे लक्ष वेधून घेण्यामागचे मुख्य कारण. या पोस्टर्सवर काँग्रेस अध्यक्ष (Congress president) राहुल गांधी (Rahul Gandhi), काँग्रेस नेते कमलनाथ आणि काँग्रेसचे दिवंगत नेते, इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे पुत्र, माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचे बंधू संजय गांधी (Sanjay Gandhi) यांचे चेहरे झळकत होते. राहुल गांधी, कमलनाथ आणि संजय गांधी यांचे चेहरे पोस्टरवर एकत्र पाहून अनेकांना आश्चर्य वाटले खरे. पण, राजकारणातील जाणकार आणि अनेक ज्येष्ठ मंडळींना मात्र यात काहीच आश्चर्य वाटले नाही. त्यांनी हे सत्यच आहे अशी प्रतिक्रिया दिली.
संजय, राहुल यांच्यापुढे कमलनाथ यांची प्रतिमा छोटी
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये कमलनाथ आणि ज्योतिराधित्य सिंधिया यांच्या नावाची चर्चा होती. काँग्रेस नेतृत्त्वाने कमलनाथ यांच्या नावाला पसंती दिली. त्यानंतरच ही पोस्टर्स शहरभर झळकली आहेत. या पोस्टर्सचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, पोस्टरवर राहुल गांधी आणि संजय गांधी यांची प्रतिमा इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आली आहे की, त्यामुळे कमलनाथ यांची प्रतिमा बरीच छोटी दिसत आहे.
संजय गांधी यांच्यासोबत कमलनाथही तिहार तुरुंगात
कमलनाथ आणि दिवंगत संजय गांधी हे एकेकाळचे घनिष्ठ मित्र. त्यांची ही मैत्री शाळेत असल्यापासूनची. शाळेत असताना अनेक मित्र एकत्र पाहतात तसे या दोन मित्रांनीही स्वप्न पाहिले. मोठे झाल्यावर आपणही मारुती कार बनवायची हे स्वप्न पाहिलेल्या या दोस्तीचा प्रवास त्यांना राजकारणात घेऊन आला. पत्रकार विनोद मेहता यांनी लिहिलेल्या 'संजय गांधी: अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात लिहिले आहे की, संजय गांधी यांनी कमलनाथ यांना पश्चिम बंगालमधून सिद्धार्थ शंकर रे यांच्या विरुद्ध मैदानात उतरवले होते. कालांतराने कमनलाथही दोस्तीचे पक्के ठरले. 25 जून 1975मध्ये सुरु झालेली अणीबाणी संपताच 21 मार्च 1977ला संजय गांधी यांना अटक करण्यात आली. मात्र, अटक झाल्यावर संजय गांधी यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्रास होऊ नये यासाठी कमलनाथ जुगाड करुन तिहार जेलमध्ये पोहोचले. (हेही वाचा, सत्तांतर झाले सत्ताग्रहणही पूर्ण; मध्य प्रदेश - कमलनाथ, राजस्थान - अशोक गेहलोत यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ)
तिहार तुरुगांत गेल्यापासून कमलनाथ यांचा राजकीय आलेख वाढला
कमलनाथ यांचे तिहार जाणे हे त्यांच्या राजकीय आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. कारण, त्यामळे ते इंदिरा गांधी यांच्या नजरेत भरेल. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढताच राहिला आहे. त्यांना काँग्रेसने 1980मध्ये मध्यप्रदेश येथील छिंदवाडा येथून तिकीट दिले. त्यांच्या प्रचारासाठी स्वत: इंदिरा गांधी आल्या. त्यांनी आपल्या भाषणात जनतेला सांगितले की, मी तुम्हाला कमलनाथ यांनाच मत द्या असे म्हणणार नाही. पण, मी तुम्हाला इतके नक्कीच म्हणू शकते की, तुम्ही माझा तिसरा मुलगा कमलनाथ यांना नक्कीच मते द्या.