Photo Credit- X

Congress Leaders Photos on Food Kits: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने प्रियंका (Priyanka Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची छायाचित्रे असलेले खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. हे किट काँग्रेस नेत्याच्या घराजवळील गिरणीत ठेवण्यात आले होते. ही गिरणी काँग्रेस नेत्यांची असल्याचे बोलले जात आहे. ही अन्नधान्याच्या पाकीटे आढळल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतरत काँग्रेसकडूनही निवेदन समोर आले आहे. केरळ काँग्रेसने म्हटले आहे की, या किट्स वायनाड भूस्खलनग्रस्तांना वितरित केल्या जाणार होत्या. परंतु निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्या बाजूला ठेवण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीपीआयचे ज्येष्ठ नेते आणि वायनाड मतदारसंघातील एलडीएफचे उमेदवार सत्यान मोकेरी यांनी आरोप केला की, निवडणुकीदरम्यान मतदारांवर अयोग्यरित्या प्रभाव टाकण्यासाठी या किट्सचे वितरण करण्यात आले होते. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) कार्याध्यक्ष टी. सिद्दीकी यांनी स्पष्ट केले की, पूरग्रस्तांना वाटण्यात येणारे किट काही महिन्यांपूर्वी जमा करण्यात आले होते. ते तात्पुरत्या स्वरूपात गिरणीमध्ये साठवले गेले होते.

वायनाड लोकसभा जागेवर 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. ही पोटनिवडणूक म्हणजे प्रियंका गांधी यांच्या निवडणूक प्रवासाची सुरुवात आहे. प्रियांका दीर्घकाळ निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहिल्या आणि कुटुंबातील सदस्य आणि इतर काँग्रेस सदस्यांचा प्रचार करत राहिल्या. 52 वर्षीय प्रियंका यांचा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याकडे काँग्रेस पक्षाची धोरणात्मक खेळी म्हणून पाहिले जात आहे. राहुल गांधींनी वायनाड सोडल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रियांका गांधी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) सत्यन मोकेरी आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नव्या हरिदास यांच्या विरोधात लढत आहेत. मोकेरी हे केरळच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत, तर टेक्नोक्रॅट राजकारणी झालेल्या नव्या हरिदास व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.