Lok Sabha Election Results 2019: 'इथे भाजप जिंकलं तर पाच वर्षे टक्कल करुन फिरेन'; काँग्रेस उमेदवार सचिन चौधरी यांचा वाढीव आत्मविश्वास
bald

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक मतमोजणीचे जे आकडे देशभरातून हाती येत आहेत ते पाहता भाजप आणि एनडीए सत्तेत पुनरागमन करतील अशी चिन्हे आहेत. देशभरातूनच भाजपसाठी मोठे बहुमत मिळेल असे स्पष्ट संकेत मिळत असताना एका काँग्रेस उमेदवाराने मात्र धक्कादायक विधान केले आहे. 'उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा लोकसभा मतदारसंघातून जर भाजप विजयी झाला तर, पुढची पाच वर्षे आपण डोक्यावर टक्कल ठेऊन फिरेन', असे या कार्यकर्त्याने म्हटले आहे. सचिन चौधरी (Sachin Chaudhary) असे या उमेदवाराचे नाव आहे.

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार सचिन चौधरी यांनी ही प्रतिक्रिया एक्झिट पोल्सनी वर्तवलेल्या अंदाजानंतर व्यक्त केली होती. एक्झिट पोल्सनी वर्तवलेले अंदाज पाहून नाराज झालेल्या चौधरी यांनी 'एक्झिट पोल्सचे अंदाज खोटे आहेत. केवळ अफवांवर मत बनवून त्यांनी आकडे दिले आहेत. त्यातही अमरोहा मतदारसंघातून भाजप विजयी होईल हा अंदाज तर साफ खोटा आहे. या मतदारसंघातून जर भाजप जिंकला तर, पुढची पाच वर्षे मी डोक्यावर टक्कल ठेऊन फिरेन', अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी व्यक्त केली होती.

(हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: NDA ची विजयाकडे कूच; शेअर बाजार उसळला, सेन्सेक्स पहिल्यांदा 40,000 च्या पार)

दरम्यान, देशभरातून मतमोजणीची आकडेवारी हाती येत आहे. अर्थात हाती आलेली आकडेवारी ही केवळ कल आहेत. अद्याप मतमोजणी सुरु आहे. ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे कल बदलूही शकतात तसेच, आघाडी आणि पिछाडीतही बदल होऊ शकतात. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंतिम निकाल हाती येईपर्यंत वाट पाहणे हेच महत्त्वाचे आहे.