Conflict in Congress: काँग्रेसमधील संघर्ष कायम असल्याचे चित्र, कपील सिब्बल यांचे सूचक ट्विट; सोनिया गांधी यांची गुलाम नबी आजाद यांच्याशी फोनवरुन चर्चा
Ghulam Nabi Azad, Kapil Sibal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला लिहिलेल्या त्या पत्रानंतर काँग्रेस वर्किंग कमीटी (CWC) बैठक पार पडली. या बैठकीत घमासान झाल्यानंतर अद्यापही काँग्रेस पक्षात संघर्ष कायम अल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सीडब्ल्यूसी सदस्य कपील सिब्बल (Kapil Sibal) हे सातत्याने ट्विटरवर आपली मतं मांडत आहेत. सिब्बल यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांना बळ मिळत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेतृत्व डॅमेज कंट्रोल करण्यात व्यग्र आहे. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद (Ghulam Nabi Azad) यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचे वृत्त आहे.

काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी आपल्या ट्विटमध्ये बुधवारी (26 ऑगस्ट) म्हटले आहे की, विचारांची लढाई लढताना लढताना राजकारणात, न्यायालयात, सामाजिक कार्यात, कार्यकर्त्यांमध्ये अथवा सोशल मीडियात विरोधक तर भेटतच असतात. परंतू, समर्थनासाठी व्यवस्था करावी लागते.

कपील सिब्बल यांच्या ट्विटमुळे सुरु झालेल्या चर्चा एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला काँग्रेसने डॅमेज कंट्रोल सुरु केले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील नेते गुलाम नबी आजाद यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या वेळी पक्षातील विविध प्रश्नांवर विचार केला जाईल आणि त्या प्रश्नांवर तोडगाही काढला जाईल, अशी ग्वाही सोनिया गांधी यांनी दिल्याचे समजते. (हेही वाचा, CWC Meeting: काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम, पुढील 6 महिन्यात नव्या प्रमुखाची निवड होणार असल्याचा CWC बैठकीत निर्णय)

काँग्रेस पक्षातील ज्या 23 नेत्यांनी पक्षनेतृत्वाला पत्र लिहिले आहे. त्या पत्रात पत्राच्या सर्वोच्च स्तानापासूनत ते शेवटच्या टोकापर्यंत बदलाची मागणी करण्यात आली आहे. पक्षाला पूर्णवेळे नेतृत्व देऊ शकेल अशा अध्यक्षाची आवश्यकता आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस वर्किंग कमिटी बैठकीत मात्र, ज्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाला पत्र लिहिले त्यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपावर कपील सिब्बल आणि गुलाम नबी आजाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.