![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/10/Chirag-Paswan-380x214.jpg)
बिहार विधानसभा निवडणूकीमध्ये यंदा महागठबंधन (Mahagathabandhan) आणि भाजप-जेडीयू (BJP-JDU) या दोघांमध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. दरम्यान 243 जागांसाठी झालेल्या या निवडणूकीमध्ये सध्या दोन्ही युतींमध्ये सुरूवातीचे कल पाहता क्षणाक्षणाला चित्र पालटत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बिहारमध्ये सध्या सत्तांतर होऊ शकतं आणि महागठबंधन सत्तेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. मात्र जर ही टक्कर अगदीच अटीतटीची झाली तर लोकजनशक्ती पक्षाचे (LJP) चिराग पासवान (Chirag Paswan) बिहार मध्ये 'किंगमेकर'ची भूमिका बजावू शकतात. सध्या सुरूवातीच्या कलांमध्ये एलजेपीकडे 6-7 जागा आहेत. त्यांचं हे यश देखील अनेकांना सध्या चकीत करणारं आहे. एक्झिट पोलमध्ये त्यांना 2-3 पेक्षा जास्त जागा वर्तवण्यात आलेल्या नव्हत्या.
इथे पहा बिहार निवडणूक निकालाचा मतदार संघनिहाय निकाल
दरम्यान बिहार निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये चिराग पासवान यांच्यावर असा आरोप लावण्यात आला होता की ते भाजपच्या सांगण्यावरूनच एकटयाने निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. कारण जर जेडीयू ची कामगिरी खराब ठरली तर भाजपा थेट मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकू शकते. अशा परिस्थितीमध्ये एलजेपी पुन्हा भाजपाला समर्थन देऊ शकते. कारण चिराग यांच्या वक्तव्यांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्यासोबत ते आहेत. मात्र त्यांनी जेडीयूच्या नीतिश कुमार यांच्या विरूद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. कलांमध्येही भाजपा प्रादेशिक पक्ष आरजेडीला तगडं आव्हान देत आहे.
राजकारण हा अनपेक्षित डावपेचांचा खेळ आहे. त्यामुळे राजकीय कोंडी पाहता ते आयत्या वेळी कोणता आणि कसा निर्णय घेतील हे आता ठोस सांगणं कठीण आहे. कारण नुकतेच त्यांनी राजद नेता तेजस्वीच्या बर्थ डे दिवशी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्यामुळे दोन युवा नेते एकत्र येत बिहारच्या राजकारणामध्ये नवा अध्याय लिहू शकतात. दरम्यान या केवळ शक्यता आहेत. आणि अंतिम निकालापर्यंत एलजेपीकडे खरंच अपेक्षेप्रमाणे जागा टिकल्या तरच हे चित्र वास्तवात येणं शक्य आहे.