बसप सर्वेसर्वा मायावती लोकसभा निवडणूक लढणार नाहीत
Mayawati | (Photo Credits: PTI/ file photo)

Lok Sabha Election 2019: बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) सर्वेसर्वा मायावती (Mayawati) लोकसभा निवडणूक (Lok Sabha) लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत मायावती यांनी बुधवारी ही घोषणा केली. समाजवादी पक्ष आणि बसप आघाडी (SP BSP Alliance) मजबूत स्थितीत आहे. सध्यास्थितीत मी लोकसभेची निवडणूक न लढवणंच हिताचं आहे. त्यामुळे पक्षहीत डोळ्यासमोर ठेऊनच आपण हा निर्णय घेतल्याचे मायावती यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यात आघाडी झाल्यामुळे मायावती या कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात? याबाबत उत्सुकता होती. राजकीय वर्तुळात त्यांच्या मतदारसंघाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र, मायावती यांच्या घोषणेनंतर या तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे. माझ्या उमेदवारीपेक्षा आघाडी जिंकणे महत्त्वाचे असल्याचे मायावतींनी या वेळी सांगितले. गरज पडल्यास मी नंतरही संसदेत पोहोचू शकते, असेही मायावती म्हणाल्या. (हेही वाचा, व्हिडिओ: मायावती केस रंगवतात, फेशिअल करतात; मोदी मात्र स्वच्छ कपडे वापरतात: भाजप आमदार)

एएनआय ट्विट

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी झाल्यापासून दोन्ही पक्ष प्रत्येक क्षणी एकत्र येताना दिसत आहेत. बसप-सप आघाडीला उद्देशून अखिलेश यादव यांनी नुकतेच ट्विट केले होते. या ट्विटमध्ये सप-बसप आघाडीचा उल्लेख 'इतिहास चक्र' नावाने केला होता. तसेच, मायावतींचा उल्लेख करताना त्या गरीबांचा आवाज असल्याचे म्हटले होते.