Representational Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रासह देशातील इतर 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत 'हाय अलर्ट' (High Alert) देणाऱ्या कर्नाटक (Karnataka) पोलिसांवर आपला इशारा मागे घेण्याची वेळ आली आहे. तसेच, देशभरात दहशतवादी हल्ल्याची माहिती देणारा कर्नाटक पोलिसांना (Karnataka Police) फोनद्वारे प्राप्त झालेला संदेशही खोटा (Hoax Call )असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पुरवल्या प्रकरणी व पोलिसांची फसवणूक केल्या प्रकरणी हा फोन करणाऱ्या एका 65 वर्षी ट्रक चालकाला बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरु पोलिसांनी (Bengaluru police) या फोनची पुष्टी करत तो खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, संभाव्य दहशतवादी हल्ल्याची फोनद्वारे माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी दक्षीण भारतातील 8 राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याबाबत इशारा दिला. या आठ राज्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला होता. श्रीलंकेत घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता विविध राज्यांतील पोलीस दलं सतर्क झाली आहेत. ज्या राज्यांना हल्ल्याबाबत पत्र प्राप्त झाले त्या राज्यांनी छापेमारी करत संशयीत दहशतवाद्यांचा तपास करण्यास सुरुवात केली होती. दरम्यानच, हे वृत्त पुढे आले आहे.

एएनआय ट्विट

प्राप्त माहितीनुसार, कर्नाटक डीजीपी यांनी तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा आणि पुड्डुचेरी या राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला होता. या राज्यांतील शहरांमध्ये 19 दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. तामिळनाडू येथील रामनाथपुरम येथे 19 दहशतवादी लपल्याचे सांगितले जात होते.

एएनआय ट्विट

या पत्रात ट्रक चालक स्वामी सुंदर मूर्ती याने बंगळुरु पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करुन संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती दिली होती. यात स्वामी सुंदर मूर्ती याने दावा केला होता की, पुड्डूचेरीसह इतर सात राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचन्यात आला आहे. या हल्ल्यातील सर्व 19 दहशतवादी हे तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम येथे लपल्याचेही त्याने म्हटले होते.