Narendra Modi, Amit Shah (Photo Credit Wikimedia Commons)

दरवर्षी आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) दिवशी संपूर्ण पंढरपूर गजबजलेले दिसायचे. मात्र, यावर्षी विठू माऊलची भक्तांसोबतची भेट चुकली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे संकट वावरत आहे. यामुळे विठ्ठल भेटीच्या ओढीला वारकऱ्यांना यंदा आवर घालावा लागला आहे. तसेच विठ्ठलाचा जयघोष करत जाणाऱ्या ज्ञानोबा, तुकाराम महाराजांच्या पालख्याही घाईत एसटीतून विठ्ठलाच्या भेटीला गेल्या आहेत. दरम्यान, प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही मराठी भाषेतून ट्विट करत सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपारिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, आषाढी एकादशी साजरी होत आहे. परंतु, यावर्षी विठ्ठल मंदिर परिसर सुनानुना असून प्रत्येकजण घरातूनच हात जोडून विठ्ठलाचे आशिर्वाद घेत आहेत. आषाढी एकदशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी वारकरी परंपरेच्या इतिहासाला उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मराठीतून सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे देखील वाचा- Pandharpur Vitthal Rukmini Live Darshan: आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घरबसल्या टीव्ही, ऑनलाईन माध्यमातून असे घेऊ शकाल!

नरेंद्र मोदी यांचे ट्वीट-

आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी, असे ट्वीट नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

अमित शाह यांचे ट्विट-

आषाढी एकादशीनिमित्त समस्त वारकरी बंधू-भगिनींना शुभेच्छा! महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि सर्व संतांना प्रिय असलेले पवित्र निर्मळ तिर्थक्षेत्र म्हणजे पंढरी व श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा विठोबा ! “सकळ देवांचे माहेर। सकळ संतांचे निजमंदिर। ते हे पंढरपूर जाणावे।।” संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यासारख्या संतांनी विषमतेच्या भिंती दूर सारून समाजात समानता आणि सलोखा निर्माण केला. अश्या सर्व महान संतांना कोटी कोटी नमन! जय जय पांडुरंग हरी! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! अशा आशायाचे ट्वीट अमित शाह यांनी केले आहे.