Deepinder Goyal (संग्रहित संपादित प्रतिमा),

फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोचे (Zomato) डिलिव्हरी एजंट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता या संदर्भात झोमॅटोचे सह-संस्थापक दीपंदर गोयल (Deepinder Goyal) यांच्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. Naukri.com चे मालक संजीव बिखचंदानी यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपिंदर गोयल दर तीन महिन्यांनी किमान एकदा कंपनीचा ट्रेडमार्क लाल टी-शर्ट परिधान करून डिलिव्हरी बॉयची भूमिका पार पाडतात.

होय, मात्र आजपर्यंत त्यांना फूड डिलिव्हरी करताना कोणीही ओळखू शकलेले नाही. याबाबत माहिती देताना बिखचंदानी म्हणतात, ‘नुकतेच मी झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल आणि त्यांच्या संपूर्ण टीमला भेटलो. मला हे जाणून खूप आनंद झाला की, दीपंदरसह सर्व वरिष्ठ व्यवस्थापक लाल रंगाचा झोमॅटो टी-शर्ट घालून, बाईकवरून दिवसभर फूडची डिलिव्हरी करतात. साधारण 3 महिन्यातून एकदा ही फूड डिलिव्हरी केली जाते.’

बिखचंदानीने पुढे लिहिले की, लाल रंगाच्या टी शर्टमध्ये असलेल्या कंपनीच्या सीईओला अजूनतरी कोणीही ओळखू शकले नाही. ही गोष्ट ते गेले 3 वर्षे करत आहेत असेही बिखचंदानी यांनी सांगितले. तर अशाप्रकारे पुढच्या वेळी तुमच्या घरी झोमॅटो डिलिव्हरी एजंट आल्यास त्याच्याकडे निरखून पहा, कदाचित तो कंपनीचा सीईओ असू शकतो.

दरम्यान, झोमॅटोचा फूड कार्निव्हल नोव्हेंबरमध्ये सुरू होत आहे. झोमॅटो नोव्हेंबरमध्ये देशात फूड आणि एंटरटेनमेंट कार्निव्हल 'झोमॅलँड' पुन्हा आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. झोमॅटोच्या या झोमलँड सीझनमध्ये सुमारे 400 रेस्टॉरंट्स सहभागी होत आहेत. (हेही वाचा: फर्निचर कंपनी Wooden Street भारतात करणार 166 कोटी रुपयांची गुंतवणूक; मिळणार 3000 लोकांना नोकऱ्या)

या कार्निव्हलमध्ये उत्तम खाद्यपदार्थ आणि मनोरंजनही असेल. यासोबतच मजेदार खेळही असतील. 'झोमलँड स्पर्धा पुणे, मुंबई, अहमदाबाद, नवी दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि कोलकाता येथे होणार आहे. हा कार्यक्रम नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू होईल, जो फेब्रुवारी 2023 पर्यंत चालेल.