शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी वरळी हिट अँड रन प्रकरणाचा (Worli Hit-And-Run Case) उल्लेख हत्या असा केला आहे. आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी मुबई येथील वरळी कोळीवाडा येथील नाखवा कुटुंबीयांची आज (बुधवार, 10 जुलै) भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईच काय राज्यात आणि देशातही अपघाताच्या अनेक घटना घडत असतात. पण ही घटना अपघात नव्हे, आरोपीने केवळ वाहन थांबवले नसल्याने नाखवा कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे हा अपघात नसून हत्याच असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे यांनी मृत कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
कावेरी नाखवा यांचा मृत्यू
दरम्यान, वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याने आपली बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे चालवून मुंबई येथील नाखवा दाम्पत्यास कारखाली चिरडले. यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरु आहे. आरपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात 45 वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाल्यामुळे राजकीय नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह (23) हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. (हेही वाचा, BMW Hit And Run Case: वरळी हिट-अँड-रन प्रकरणाशी संबंधीत जुहू येथील बारचे अनधिकृत बांधकाम बीएमसीने पाडले (Watch Video))
आरोपीला अटक करण्यास विलंब का?
आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याच्या गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, "7 तासांनी नमुने घेतल्यास तुम्हाला रक्तात जे हवे आहे ते मिळेल का? सध्या रक्ताच्या नमुन्यावर अवलंबून राहू नका, अशी माझी मागणी आहे. सीसीटीव्हीमध्ये काय दिसले, ड्रायव्हर काय म्हणाला, पीडिता काय म्हणाली? याही बाबी विचारात घ्यायला हव्यात. हा अपघात नव्हे. आरोपीने अपघातग्रस्त दाम्पत्य गाडी थांबव म्हणत असतानाही त्यांना फरफटत का नेले. त्यानंतर घटनास्थळावरुन पळ का काढला, यांसारख्या बाबी समोर यायला हव्यात, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. (हेही वाचा, Mumbai Hit And Run Case: शिंदे गटातील शिवसेना उपनेते Rajesh Shah पोलिसांच्या ताब्यात; आदित्य ठाकरे यांची कडक कारवाईची मागणी)
आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
मुंबईतील एका न्यायालयाने मंगळवारी राजेश शाहचा ड्रायव्हर राजऋषी सिंग बिदावत याच्या पोलिस कोठडीत गुरुवार, 11 जुलैपर्यंत वाढ केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आलिशान कारने कावेरी नाखवा हिला धडक दिली आणि तिचा पती जखमी झाला तेव्हा बिदावत मिहिर हा मुख्य आरोपी शाहसोबत होता. "आम्हाला मिहीर आणि ड्रायव्हरची एकत्र चौकशी करायची आहे. आम्हाला त्याच्या कोठडीची गरज आहे कारण तो ड्रग्ज घेतो आणि अपघाताच्या वेळी तो तिथेच होता. त्यांनी कारसह एका महिलेला धडक दिली,"असे अवाहन मुंबई पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात युक्तिवाद केला. (हेही वाचा, ‘मम्मी माझे सर्वस्व! ती मला परत हवी’ वरळी येथील BMW Hit And Run मध्ये ठार झालेल्या कावेरी नाखवा यांच्या मुलीची आर्त हाक (Watch Video)
आरोपीच्या वकिलाकडून जोरदार युक्तिवाद
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की पोलिसांकडे चालकाच्या सहभागाचा कोणताही पुरावा नाही. "ड्रायव्हर त्या पबमध्ये नव्हता. त्याने ड्रग्ज घेतल्याचा किंवा असे कोणतेही पदार्थ सेवन केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. पुराव्याशिवाय पोलिस कोठडीत काही अर्थ नाही," असे वकील म्हणाले. दरम्यान, कोर्टाने आरोपींची कोठडी वाढवली.
व्हिडिओ
#WATCH | Worli (Mumbai) hit-and-run case: Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray meets Pradeep Nakhwa, husband of the victim Kaveri Nakhwa. pic.twitter.com/oLSzOQrVkF
— ANI (@ANI) July 10, 2024
वरळी येथील डॉ. ॲनी बेझंट रोडवर रविवारी 7 जुलै रोजी झालेल्या अपघातानंतर फरार असलेल्या मिहीर शाहला मंगळवारी विरार येथून अटक करण्यात आली. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी चौदा पथके तयार केली होती. पोलिसांनी राजऋषी सिंग बिदावत आणि मिहीरचे वडील राजेश शहा यांनाही या प्रकरणात सहभाग असल्याच्या कारणावरून अटक केली.
पीडितेचा पती प्रदीप नाखवा याने राजकीय नेत्यांबद्दल नाराजी आणि अविश्वास व्यक्त केला. "हे पक्षाचे नेते काहीही करणार नाहीत; हा त्यांच्या नेत्याचा मुलगा आहे. कोणालाही विकत घेणारा मोठा माणूस आहे. आमच्या बाजूने कोण आहे? काय झाले ते जाणून घेण्यासाठी फडणवीस किंवा शिंदे आमच्या घरी आले होते का? अजित पवार आले होते का? ते सर्वजण सत्तेच्या लालसेने आंधळे झाले आहेत, असा आरोपही प्रदीप नाखवा यांनी केला.