उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील बरेली ( Bareilly) येथील एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. येथील एका सासूने (Mother in Law) आपल्या सुनेचा (Daughter in Law) कडाडून चावा घेतला. यात सूनेच्या बोटाला मोठी इजा झाली. या घटनेत सुनेची बोटे तुटल्याचेही समजते. सूनेकडून जेवन बनविण्यासाठी उशीर झाल्याच्या कारणास्तव सासूबाईंचा पारा चढला आणि त्यांनी हे अमानवी कृत्य केले. प्रकरण पोलिसांमध्ये पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी सुनेची वैद्यकीय तपासणी केली. तिची बोटे मानवी दातांनी चावल्यामुळेच तुटल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
बरेली येथील हरगोविंद नगर परिसरात ही घटना घडली. प्रीति भारती (वय 32 वर्षे) असे पीडित सुनेचे नाव आहे. तर, सुशीला देवी (वय 65) असे आरोपी सासूचे नाव आहे. इज्जतनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, एसएचओ उपेंद्र सिंह यांनी सांगतले की, 'पीडिता प्रीति भारती यांनी शनिवारी तक्रार दिली. यात तिने म्हटले आहे की, मी बाळाला स्तनपान करत होते. दरम्यान, सासू सुशीला देवी यांनी मला जेवण बनविण्यास सांगितले. यावर बाळाला स्तनपान केल्यानंतर मी जेवण बनवते असे सांगितले. मात्र, उत्तरामुळे नाराज आणि संतप्त झालेल्या सुशीला देवी यांनी माझ्या हाताला कडाडून चावा घेतला. यात माझ्या हाताची बोटे तुटली.' (हेही वाचा, धक्कादायक! बायको-मुलीचा गळा दाबून मृतदेह पेटवले, पती-प्रेयसीचा संतापजनक प्रकार)
एसएचओ उपेंद्र सिंह यांनी पुढे सांगितले की, 'या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. घडल्या घटनेची माहिती कळताच तक्रार नोंदवून घेत पोलिस पीडितेच्या घरी सासूला अटक करण्यासाठी गेले. मात्र, पोलीस येणार याची कुणकुण लागताच सासूने पोबारा केला. पोलीस तिचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सासुविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.