Nana Patole | (Photo Credits: ANI)

महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) मारेकरी नथुराम गोडसेवरील (Nathuram Godse) 'व्हाय आय किल्ड गांधी' (Why I killed Gandhi) या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटामध्ये खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) नथुराम गोडसेची भूमिका सकारत आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, हा चित्रपट म्हणजे गांधींच्या मारेकऱ्याला नायक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस या चित्रपटाला विरोध करणार असून, हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित न करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात येणार आहे.

या वाढत्या गदारोळात शुक्रवारी 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, या चित्रपटात महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका साकारणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा प्रचंड विरोध झाला. कोल्हे यांचे पक्षीय सहकारी आणि महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे यांनी अशा भूमिका स्वीकारण्यावर उघड आक्षेप घेतला. ट्रेलर पाहून संतापलेल्या आव्हाड यांनी अमोल कोल्हे यांच्यावर गोडसेला 'सपोर्ट' केल्याचा आरोप केला आहे.

कॉंग्रेसनंतर, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या चित्रपटावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या चित्रपटात ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ यांचा मारेकरी आणि देशद्रोही नथुराम गोडसेचा गौरव करण्यात आला आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, गांधीजी असे व्यक्ती आहेत ज्यांचे संपूर्ण भारत आणि जग कौतुक करते. गांधीजींची विचारधारा ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेम आणि त्यागाचे प्रतीक आहे. (हेही वाचा: खासदार अमोल कोल्हे दिसणार नथुराम गोडसेच्या भूमिकेत; 30 जानेवारीला प्रदर्शित होणार चित्रपट, नवीन वादाची शक्यता)

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याने विशेष न्यायालयात गांधींच्या हत्येमागील कारण स्पष्ट करताना केलेल्या निवेदनावर आधारित हा चित्रपट असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हे पुस्तक नथुराम गोडसेचे भाऊ गोपाळ गोडसे यांनी लिहिले आहे. हे पुस्तक 27 डिसेंबर 2015 रोजी प्रकाशित झाले. आता या पुस्तकावर एक चित्रपट तयार करण्यात आला आहे, जो 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2017 सालचा आहे.