कांदा (Photo Credit : ThoughtCo)

पश्चिम बंगालमधील एका दुकानामध्ये चोरी झाल्याची घटना घडली. मात्र या चोरीमध्ये भामट्यांनी पैशांची नव्हे तर कांद्याची चोरी केल्याची बाब समोर आली आहे. दुकानामधून जवळजवळ 50 हजार रुपयांचा कांदा चोरीला गेला आहे. कांद्याचे दर सध्या 100 रुपयांच्यावर जाऊन पोहचले आहेत. याच कारणामुळे कांदा मालकाने दुकानामध्ये साठवून ठेवला होता. या साठवलेल्या कांद्यामधून नफा मिळेल या हेतूने ठेवलेला कांदा भामट्यांनी पळवला आहे.

अक्षय दास नावाच्या एका व्यापाऱ्याने असे म्हटले आहे की, लसूण, कांदा आणि आल यांची 50 हजार रुपये किंमत असून काही अज्ञातांनी त्याची चोरी केली आहे. तसेच लसूण आणि आल यांची किंमत जवळजवळ 12 हजार रुपये होती. चोरी झालेले दुकान पूर्व मिदनापुर मधील सूतहाट पोलीस स्थानकाअंतर्गत येते. तर चोरी झाल्याने व्यापाऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. या प्रकारावर दास यांनी पैशांऐवजी कांद्याची चोरी झाल्याची बाब धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. दुकानाच्या येथील स्थानिक लोकांनी असे म्हटले की, भामट्यांनी टाळे तोडून कांद्याची चोरी केली आहे. कारण सध्या कांद्याचे दर 100 रुपयांच्या पार झाल्याने त्यांनी हा प्रकार केला आहे.(कांद्याचे दर 150 रुपयांवर पोहचणार, सामान्यांच्या शिखाला बसणार कात्री) 

काही दिवसांपूर्वीच नाशिक मधील कळवण तालुका येथे राहणाऱ्या बाजीराव पगार यांचा कांदा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. राहुल यांच्या गोदामध्ये एकूण 117 क्रेट्समध्ये 25 टन कांद्यांची साठवण करुन ठेवली होती. मात्र या एकूण कांद्याच्या साठ्यामधील 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला गेला आहे. याबाबत तातडीने राहुल यांनी पोलिसात धाव घेत त्याबाबच अधिक माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर चोरी झालेला कांदा गुजरात आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता.