पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलीगुडीमध्ये (Siliguri) मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्यामुळे एका वडिलांना आपल्या सहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह पिशवीत भरून 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. वेगवेगळ्या बसमधून प्रवास करून ही व्यक्ती आपल्या घरी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीचा दावा आहे की, त्याला सरकारी रुग्णवाहिका मिळाली नाही आणि खासगी रुग्णवाहिकेसाठी आठ हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र तेवढे पैसे त्याच्याकडे नव्हते. त्यामुळेच त्याला हे पाऊल उचलावे लागले.
दुसरीकडे, या प्रकरणात या व्यक्तीने रुग्णवाहिका मागितली नसल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु या संपूर्ण घटनेवरून भाजप आणि तृणमूल आमनेसामने आले आहेत. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर (North Dinajpur) जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.
इथल्या कालियागंजच्या दंगापात्रा गावात राहणाऱ्या आशिम देब शर्माला काही दिवसांपूर्वी आपल्या जुळ्या मुलांना कालियागंज सरकारी सामान्य रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तिथून हॉस्पिटलने या मुलांना रायगंज मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर केले, तेथून त्यांना पुन्हा दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी येथील नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (NBMCH) पाठवण्यात आले. हे उत्तर बंगालमधील सर्वात मोठे रुग्णालय आहे.
इथे उपचारानंतर एका बाळाला डिस्चार्ज मिळाला. शर्मा यांची पत्नी गुरुवारी या मुलासह घरी परतली. मात्र, दुसरे अपत्य अजूनही रुग्णालयात असल्याने आशिम देब शर्मा मागे थांबले. शनिवारी सायंकाळी या मुलाचा मृत्यू झाला. मीडियाशी बोलताना शर्मा म्हणाले, ‘मुलाच्या मृत्युनंतर त्याचा मृतदेह घरी घेऊन जायचा होता, मात्र खाजगी रुग्णवाहिका चालकांनी 8,000 रुपयांची मागणी केली. मी एक गरीब स्थलांतरित कामगार आहे आणि मी ही रक्कम भरण्यास सक्षम नव्हतो. त्यानंतर मी माझ्या मुलाचा मृतदेह बॅगेत टाकला आणि बसने सिलीगुडी ते रायगंज आणि नंतर कालियागंज असा प्रवास केला.’ (हेही वाचा: Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात सुमारे 5800 नागरिकांचे मिझोराममध्ये स्थलांतर; अधिकाऱ्यांची माहिती)
सिलीगुडी ते कालियागंज हे अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे. शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी आधीच मुलांच्या उपचारासाठी 16,000 रुपये खर्च केले होते आणि त्यांच्याकडे खूप कमी पैसे शिल्लक आहेत. पुढे कालियागंज येथील एका स्थानिक भाजप नेत्याने बाळाचा मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र शर्मा यांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला नसल्याचे सांगितले आहे.