IMD Weather Alert: देशात पुढील पाच दिवस तापमान आणखी घटन्याची शक्यता- हवामान विभाग
Image For Representations (Photo Credits - PTI)

देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात (Temperature) मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होत आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD Weather Alert) वर्तवला आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांना थंडी आणि धुक्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस उत्तर भारतात दाट धुक्याची शक्यता आहे. पर्वतीय भागात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात तापमानात गारठा वाढण्याची शक्यता आहे.  (हेही वाचा - Rain Alert In India: देशभरातील 11 राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता- हवामान विभाग)

दिल्लीत थंडीची लाट कायम असून मंगळवारी थंडीसह दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. दाट धुक्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होत आहे, तर दुसरीकडे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. राजधानी एक्स्प्रेससारख्या गाड्याही 15 तासांहून अधिक उशिराने धावत आहेत. पालम विमानतळावर सकाळी 7 वाजता 100 मीटर दृश्यमानता नोंदवली गेली, तर सकाळी 7:30 वाजता दृष्यमानता 0 मीटरवर घसरली होती.

गेल्या तीन दिवसांत दिल्ली विमानतळावर 1,000 हून अधिक उड्डाणे 12 तासांपेक्षा जास्त उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली-गोवा इंडिगो फ्लाइटला 10 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने वैमानिकाला धक्काबुक्की केली होती.