Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट (Cold Wave) परसली आहे. यासोबतच दाट धुके आणि अनेक भागांत बर्फवृष्टी (Snowfall) होताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागात 'रेड' अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती निर्माण केली. ऐन रब्बी हंगामातील पिके जोमात असताना अनेक भागात पाऊस झाला. त्याशिवाय हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्याचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. (हेही वाचा - Weather Update: 'या' राज्यांमध्ये पावसाची हजेरी, उत्तर भारतात थंडीची लाट; वाचा हवामान विभागाचा अंदाज)

हवामान खात्याने पुढील तीन दिवस काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होऊ शकतो. त्याच्या प्रभावामुळे 16-17 जानेवारीला जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.  पुढील दोन दिवस लखनौसह उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे.

गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद येथे पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहील. दक्षिण तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.