Temperature | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह देशात पुढील तीन दिवस तापमानाचा (Temperature) पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांमध्येही 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे लोकांच्या समस्येत भर पडली असून आरोग्याशी संबधित तक्रारी देखील वाढल्या आहेत.

महाराष्ट्रात गुरुवारी कमाल तापमानाची नोंद झाली असून वर्धा येथे सर्वाधिक कमाल 43 अंश सेल्सिअस आणि बुलढाणा येथे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) आकडेवारीनुसार अकोला येथे 42.6 अंश सेल्सिअस, अमरावती 42.6, बुलढाणा 39.7, ब्रम्हपुरी 41.2, चंद्रपूर 42.4, गडचिरोली 42, गोंदिया 41.2 आणि नागपूर 42.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील अनेक भागांत तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवार, 20 मे रोजी दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय राजधानीतील कमाल तापमान शुक्रवार, 19 मे रोजी 38.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेलं. राजस्थानमध्ये काही ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याचा अंदाज आहे. जयपूर, दौसा, अलवर, भरतपूर, करौली जिल्हे आणि आसपासच्या भागात जोरदार उष्ण वारे वाहू शकतात.  गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात सतत कडक ऊन पडतंय. राष्ट्रीय राजधानीसह देशातील अनेक राज्यांमध्ये सकाळपासून रात्री उष्ण वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीही वाढत आहेत.