Lockdown: कोरोना व्हायरस लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 6 महिन्यांच्या बाळावर दाखल केला FIR; प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील उत्तरकाशी (Uttarkashi) पोलिसांचे एक आश्चर्यकारक कृत्य समोर आले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे वेगळे ठेवलेल्या लोकांनी लॉक डाऊनचे (Lockdown) उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. महत्वाचे म्हणजे ज्या लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये एक 6 महिन्याचा आणि एक 3 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर उत्तरकाशीचे डीएम यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, बाल कायद्यानुसार 8 वर्षापेक्षा लहान मुलावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही व त्यामुळे हे कसे घडले याचा तपास केला जाईल.

एएनआय ट्विट -

बाल न्याय कायदा लक्षात घेऊन नंतर या मुलांचे नाव एफआयआरमधून काढून टाकण्यात आले. उत्तरकाशीतील चिन्यालिसौडमध्ये 51 लोकांना घरीच वेगळे राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांनी हे लोक लॉक डाऊनचे आणि होम क्वारंटाईनचे पालन करीत नसल्याचे सांगितले होते. ग्रामप्रमुखांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसूल पोलिसांनी सहा महिन्यांचा आणि तीन वर्षाच्या मुलासह 51 जणांवर केस दाखल केली होती.

(हेही वाचा: खुशखबर! देशातील 'या' राज्याने सुद्धा केली कोरोनावर मात; सर्व रुग्णांची COVID19 Test आली निगेटिव्ह)

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा 47 जणांना संसर्ग झाला आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्यात कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही. उत्तराखंडमध्ये, देहरादूनमध्ये या आजाराने ग्रस्त लोकांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात असलेल्या कोरोनाच्या एकूण 47 रुग्नापैकी 25 एकटे देहरादूनचे आहेत. नैनीतालमध्ये 9 आणि हरिद्वारमध्ये 7 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात चांगली गोष्ट म्हणजे 47 रुग्णांपैकी 24 लोक बरे झाले आहेत. अशा प्रकारे लवकरच संपूर्ण राज्य कोरोना मुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी व्यक्त केला आहे.