उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका लग्नात रसगुल्ल्यावरून (Rasgulla) मोठा वाद झाला आणि या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमीही झाला आहे. जखमीला गंभीर अवस्थेत सैफईच्या पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. घडल्या प्रकाराबाबत तिघांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. चक्क रसगुल्ल्याच्या वादातून झालेल्या हत्येमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कुरवली पोलीस ठाण्यातील बिकापूर गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहवालानुसार, रणवीर सिंग नावाची व्यक्ती गुरुवारी संध्याकाळी बिकापूर गावातील आपल्या नात्यातील लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेला होता. सिंग हा वधूपक्षातर्फे लग्नात सामील झाला होता. यावेळी त्याचा मेहुणा राम किशोरदेखील त्याच्या सोबत होता.
तिकडे लग्नाचे विधी चालू होते व इकडे जेवणाची पंगत बसली. सर्वजण हसत खेळत जेवणाचा आनंद घेत होते. त्याचवेळी एक तरुण रसगुल्ल्याची बादली जाताना रणवीरला दिसला. त्याने ती बादली आपल्याजवळ आणण्यास सांगितले. त्याचवेळी दुसरी एक व्यक्ती त्या बदलीमधून रसगुल्ला खात होती व हीच गोष्ट रणवीरला खटकली. त्याने त्यावर आक्षेप घेतला व त्यानंतर भांडणाला सुरुवात झाली. प्रकरण इतके वाढले की ते हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यानंतर गावातील लोकांनी लाठ्या-काठ्याने रणवीरला मारायला सुरुवात केली. (हेही वाचा: Delhi Double Murder: अवैध संबंध असल्याचा संशयातून पत्नीसह मुलाची हत्या)
या वादात आरोपी गावकऱ्यांनी रणवीर सिंगला बेदम मारहाण केली, तर त्याचा मेहुणा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सैफई पीजीआयमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेमध्ये रणवीरचा जागीच मृत्यू झाला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल केला. राजेश कुमार (एसएसपी) यांनी सांगितले की, या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.