परवानगी न घेता दाढी (Beard ) वाढवल्याचा ठपका ठेवत उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) प्रशासनातील एका मुस्लीम अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक इंतेसार अली ( Intesar Ali) असे या अधिकाऱ्याचे नाव आहरे. इंतेसार अली (Police Sub-inspector Intesar Ali) यांना दाढी काढण्याबाबत तीन वेळा पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या. परंतू, त्यानंतरही त्यांनी आपली दाढी कायम ठेवली होती. त्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आल्याचे समजते.
बागपत येथील एसीपी अभिषेक सिंह यांनी म्हटले आहे की, पोलीस मॅन्युअलनुसार केवळ शिख धर्मींयांनाच दाढी राखण्याची परवानगी आहे. इतर धर्मीय पोलीस कर्मचाऱ्यांना आपला चेहरा स्वच्छ ठेवणे बंधनकारक आहे. त्यातही जर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला दाढी ठेवायचीच असेल तर त्याला तशी विशेष परवानगी घ्यावी लागते. मात्र, इंतेसार अली यांनी अशी कुठलीच परवानगी घेतली नव्हती.
इंतेसार अली यांना एक तर दाढी वाढविण्यासाठी परवानगी घ्या किंवा दाढी काढा असे वारंवार सांगण्यात आले होते. त्याबाबत त्यांना तीन वेळा सूचनाही देण्यात आल्या होत्या. तरीही त्यांनी परवानगीही घेतली नाही आणि दाढीही काढली नाही. परिणामी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (हेही वाचा, पुरुषांच्या दाढीत असतात कुत्र्यांपेक्षा जास्त घातक बॅक्टेरिया; ठरू शकतात आजारपणाचे कारण)
प्राप्त माहितीनुसार इंतेसार अली हे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून पाठीमागील तीन वर्षांपासून बागपथ येथे कर्तव्यावर होते. दरम्यान, इंतेसाह आली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी प्रशासनाकडे दाढी राखण्याबाबत परवानगी मागितली होती. परंतू, कोणताही प्रतिसाद आला नव्हता.