हैदराबाद: ट्रेनमधून पडलेल्या तरुणाने स्वतःचे आतडे हातात धरून 9 किमी चालत गाठले हॉस्पिटल
Image For Representation (Photo Credits: Pixabay, File Image)

तेलंगणा: देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची सार्थता पटवून देणारा एक प्रसंग अलीकडेच तेलंगणा (Telangana) मध्ये घडला. सुनील चौहान (Sunil Chauhan)  या उत्तर प्रदेशातील तरुणाचे नशीब इतके जोरावर होते की धावत्या ट्रेन मधून खाली पडून, त्याचे पोट फाटून त्यातल्या आतड्या हातात आल्यानंतरही त्याचा जीव वाचला आहे. पण खरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा अपघात घडल्यावर अन्य कोणाच्या मदतीची वाट बघत बसण्यापेक्षा सुनील यांनी स्वतःचे आतडे हातात धरून तब्बल 9 किमी अंतरावर असलेले हॉस्पिटल पायी चालून गाठल्याचे समजत आहे. ही थरारक घटना तेलंगणमधील वारंगल (Warangal) येथे उप्पल- हसनपार्थी स्थानकादरम्यान घडली.

माध्यमांच्या माहितीनुसार, सुनील हा उत्तर प्रदेशातील तरुण आपला भाऊ आणि अन्य काही कर्मचाऱ्यांसह संघमित्रा एक्स्प्रेस मधून प्रवास करत होता, रात्री 2 च्या सुमारास तो टॉयलेटला जाण्यासाठी आपल्या जागेवरून उठला, त्यानंतर वॉशबेसिन जवळ हात धूत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो ट्रेनच्या बाहेर पडला, यावेळी ट्रेनचा वेग वळण घेत होती आणि वेगही अधिक असल्याने साहजिकच तो रुळावर जोरदार आदळला, त्यामुळे त्याच्या पोटाला मार बसून त्याचे आतडे अक्षरशः बाहेर आले होते. मुंबईच्या ट्राफिकमुळे यकृताचा लोकलने प्रवास; अशाप्रकारे प्रवास होणारी भारतातील पहिली घटना

अशा वेळी एखादा सामान्य माणूस घाबरूनच जीव सोडेल अशी परिस्थिती होती मात्र सुनीलने धीराने घेत समयसूचकता दाखवली. कसेबसे ते आतडे पोटात ढकलून त्याने आपल्या अंगावरील शर्ट काढून पोटाला बांधले आणि बाहेर लटकणारे आतडे हातात घेऊन तो चालायला लागला. रेल्वेच्या रुळावरून पुढे 9 किमी अंतरावर असणारे हसनपार्थी स्टेशन येईपर्यंत सुनीलने चालत प्रवास केला. सुदैवाने, स्टेशन जवळ पोहचताच ही बाब स्टेशन मास्तरांच्या लक्षात आली त्यानंतर तातडीने सुनीलला वारंगलच्या महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान महात्मा गांधी हॉस्पिटल मध्ये मध्ये सुनीलवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे , तूर्तास सुनीलची प्रकृती नाजूक असली तरी धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आश्चर्य म्हणजे याबाबत सहप्रवाशांना काहीच कल्पना नव्हती.