Acid Attack in Gonda: उत्तर प्रदेशातील एकाच कुटुंबातील निद्राधीन तीन अल्पवयीन मुलींवर अॅसीड हल्ला; गोंड येथील घटना
Acid attack | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

झोपेत असलेल्या तीन अल्पवयीन मुलींवर अज्ञाताने अॅसीड हल्ला (Acid Attack in Gonda) केल्याची घटना पुढे येत आहे.ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील गोंडा (Gonda) येथे सोमवारी (12 ऑक्टोबर) घडली. प्राप्त माहितीनुसार तीनही पीडिता एकाच कुटुंबातील आहेत. त्या एकमेकींच्या सख्ख्या बहिणी असल्याचे समजते. तिघींनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पैकी एकीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहतीनुसार तिघी बहीणींचे वय अनुक्रमे 8,12,17 अशी आहे. हाथरस येथील घटनेवरुन उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलीस, सरकार नुकतेच चर्चेत आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा महिला अत्याचाराची घटना घडली आहे.

घटनेबाबत वृत्त असे की, पीडितांवर राहत्या घरी अॅसिड हल्ला झाला. 17 वर्षांच्या मुलगी अत्यंत गंभीर आहे. तर इतर दोघी बहिणी जखमी आहेत. गोंडा येथील एसओ सुधीर सिंह यांनी अॅसिड हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केल्याचे सुधीर सिंह यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, पुणे: अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत केला व्हिडिओ शूट, आरोपीला पोलिसांकडून अटक)

पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, पीडित मुली घरामध्ये वरच्या खोलीत झोपल्या होत्या. दरम्यान, अज्ञात व्यक्ताने घरावर चढून खिडकीच्या माध्यमातून तिघींवर अॅसीड फेकले.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे देशभर चर्चेत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना नुकतीच घडली. या घटनेने अवघा देश हादरुन गेला. आरोपींनी या पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिच्यावर हल्ला करत तिची जिभ कापल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा झाली. राजकारण तापले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे.