UP Shocker: जालौनमध्ये ओशोंचे प्रवचन ऐकल्यानंतर दोन मित्रांनी केली आत्महत्या; 'मृत्यू हेच सत्य आहे', व्हॉट्सॲपवर शेअर केला होता स्टेटस
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जालौन (Jalaun) येथून आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ओशोंचे (Osho) प्रवचन ऐकल्यानंतर अमन आणि बालेंद्र या दोन मित्रांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर 'मृत्यू हेच सत्य आहे' असा संदेश शेअर केला होता. माहितीनुसार, दोन्ही मित्रांवर ओशोंचा खूप प्रभाव होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपास करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. हे संपूर्ण प्रकरण जालौनमधील काल्पी शहरातील आहे.

मंगळवारी रात्री उशिरा विषारी द्रव्य प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. सांगितले जात आहे की, दोघेही मित्र सतत ओशोंचे प्रवचन ऐकत असत. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या मोबाईलवर तीन स्टेटस पोस्ट केले होते, ज्यावरून हे दिसून येते की कदाचित ते त्यांच्या मृत्यूपूर्वी ओशोंचे प्रवचन ऐकत होते.

विष प्रश्न केल्यानंतर बलेंद्रचा जागीच मृत्यू झाला. मात्र अमन जिवंत होता व त्याची प्रकृती बिघडू लागली होती. त्यानंतर त्याने कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही तातडीने उपचारासाठी काल्पी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र उपचारापूर्वीच अमनचाही मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. या दोघांनी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. अमन मेडिकल स्टोअर चालवत होता आणि तो विवाहित होता तर बलेंद्रचे लग्न झालेले नव्हते. (हेही वाचा: Chhindwara Murder Case: छिंदवाड्यामध्ये सामुहिक हत्येने खळबळ; पत्नीशी भांडण झाल्यानंतर कुटुंबातील 8 सदस्यांची कुऱ्हाडीने हत्या, नंतर आरोपीने गळफास घेत केली आत्महत्या)

दरम्यान, आत्महत्येपूर्वी अमनने 3 स्टेटस पोस्ट केले होते. पहिल्या स्टेटसमध्ये लिहिले होते- ‘तू तुझ्या वाटेवर, मी माझ्या वाटेवर’. या व्हिडिओमध्ये काही लोक मृतदेह घेऊन जाताना दिसत होते. दुसऱ्या स्टेटसमध्ये लिहिले होते- ‘आयुष्यात असे काम निवडा जे तुमचा आनंद असेल’. तिसऱ्या स्टेटसमध्ये जळणाऱ्या मृतदेहाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.