Uber Mask Verification Selfie: कॅबने प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी; उबरने लाँच केले नवे फीचर, मास्कवाला सेल्फी पाठवणे बंधनकारक
Uber | Representational Image | (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणू (Coronavirus) कालावधीत सर्वच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. आता आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून उबरने (Uber) भारतात एक नवीन फिचर सुरू केले आहे. उबरच्या या फिचरचे नाव मास्क व्हेरिफिकेशन सेल्फी (Mask Verification Selfie) असे आहे. उबरने हे वैशिष्ट्य अशा प्रवाश्यांसाठी सादर केले आहे, ज्यांनी पूर्वी मास्क न वापरता उबरच्या कॅबमध्ये प्रवास केला आहे. उबरने मास्क न घातल्याबद्दल अशा प्रवाशांना टॅग केले आहे. उबर इंडियाच्या म्हणण्यानुसार, आता अशा प्रवाशांनी मास्क घालणे आणि आपल्या पुढील प्रवासाची बुकिंग करण्यापूर्वी उबरला सेल्फी पाठवणे बंधनकारक आहे.

उबरने सप्टेंबरमध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये प्रथम हे फिचर लॉन्च केले होते. त्याठिकाणी याला यश मिळाल्यानंतर उबरने भारतात हे वैशिष्ट्य सुरू केले आहे. हे फीचर मे महिन्यात उबर ड्रायव्हर्ससाठी आधीच सुरू केले गेले आहे. इतर देशांमध्येही हे फिचर लवकरच सुरु होईल. म्हणजेच जर का तुमच्याकडे मास्क नसेल किंवा तुम्ही मास्क घातला नसेल तर तुम्हाला उबरच्या गाडीमधून प्रवास करण्याची परवानगी नसेल.

उबर इंडियाचे अधिकारी पवन वैश्य याबाबत म्हणाले. ‘नुकतेच हे दिसून आले आहे की बरेच प्रवासी उबेरच्या कॅबमध्ये मास्कशिवाय प्रवास करीत आहेत. ही गोष्ट प्रवासी आणि कॅब ड्रॉयव्हर दोघांच्याही आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळेच आम्ही अशा अनेक प्रवाशांना टॅग केले आहे, ज्यांनी पूर्वीच्या प्रवासात मास्क घातला नव्हता. आता हे नवीन फिचर विकसित करण्याचा हेतू असा आहे की, असे सर्व प्रवासी मास्क घालूनच प्रवास करतील.’ (हेही वाचा: लॉकडाऊनमध्ये चारचाकी कोमात, मुंबईमध्ये सायकल जोमात; विक्रीत मोठी वाढ)

उबर प्रवाशांना प्रवास करताना मास्क घातलेला सेल्फी पाठवावा लागले, त्यानंतर ड्रायव्हरच्या अभिप्रायावरच ते प्रवास करू शकतील. तसेच पुढच्यावेळीही मास्कचे व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतरच आपण कॅब बुक करू शकाल. या व्यतिरिक्त, उबरने गो ऑनलाइन चेकलिस्ट, ड्रायव्हरचे कोरोनाचे ज्ञान, मास्क व्हेरिफिकेशन सेल्फी आणि अन्य आवश्यक सुरक्षा उपायांची माहिती जारी केली आहे.