Mumbai Mirror (Photo Credits: Facebook)

सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात अनेक उद्योगधंद्यांवर गदा आली आहे. हॉटेल, पर्यटन यासह पब्लिकेशन इंडस्ट्रीचे फार मोठे नुकसान झाले आहे. डिजिटलच्या युगात वर्तमानपत्रांची मागणी कमी होत गेली, त्यात कोरोनाने मागणी कमी करण्यामध्ये अजूनच भर घातली. आता टाईम्स ग्रुप (Times Group) समूहाने शनिवारी घोषणा केली की, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे ते मुंबई मिरर (Mumbai Mirror) आणि पुणे मिररचे (Pune Mirror) प्रकाशन थांबवणार आहे. मात्र, मुंबई मिरर साप्ताहिक म्हणून पुन्हा लाँच केला जाईल. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे या दोघांची डिजिटल उपस्थिती कायम राहील.

ग्रुपने एका निवेदनात म्हटले आहे की, 'अनेक महिन्यांच्या चर्चा आणि विचारविनिमयानंतर आम्ही आमची दोन प्रकाशने बंद करण्याचा अत्यंत कठीण आणि वेदनादायक निर्णय घेतला आहे'. ते पुढे म्हणतात, 'तुलनेने अल्पावधीत इतका मोठा ब्रँड बनवण्याच्या दिशेने आमच्या पत्रकारांच्या आणि इतर कर्मचार्‍यांच्या योगदानाचे आम्ही खरोखरच कौतुक करतो आणि त्यांची मेहनत आणि प्रयत्नाबद्दल त्यांचे आभार मानतो.'

टाईम्स ऑफ इंडिया समूहाने म्हटले आहे की, वृत्तपत्र उद्योगाला केवळ महसूलाबाबतच फटका बसला नाही तर, न्यूजप्रिंटच्या खर्चातील वाढीव आयात शुल्काचाही फटका बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीचा फटका बसला असताना, तसेच तिला पुन्हा उभारी येण्याची सध्या तरी आशा नसल्याने, समूहाने पुण्यातील मिररचे प्रकाशन थांबविण्याचा आणि आठवड्यातून मुंबई मिरर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र डिजिटल स्वरुपात ते उपलब्ध असतील. (हेही वाचा: Advertisement संदर्भात सर्व ब्रॉडकास्टर्ससाठी केंद्राकडून मार्गदर्शक नियमावली जाहीर, Online Gaming आणि Fantasy Sports वर दिशाभूल करणाऱ्या जाहिरात न दाखवण्याची सूचना)

मुंबई मिरर हे 15 वर्षांपूर्वी बेंगलुरू, पुणे आणि अहमदाबाद आवृत्तींनंतर लाँच केले होते. अल्पावधीतच मुंबई मिररला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. शहरासह, राज्याची व देशातील गोष्टींची इत्यंभूत माहिती, आकर्षक हेडलाईन, बातम्यांमध्ये विविधता अशा अनेक कारणांमुळे मुंबई व पुण्यातील लोकांची सकाळ याच वृत्तपत्रांनी होत होती. मात्र आता या दोन आवृत्या बंद होत असल्याने अनेकांनी सोशल मिडियावर याबाबत दुःख व्यक्त केले आहे. बेंगलोर मिरर आणि अहमदाबाद मिरर ऑपरेशन्सबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.