Tablighi Jamaat members at Delhi's Nizamuddin Markaz (Photo Credits: IANS)

भारतभरात सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे, आज याचा दहावा दिवस चालू आहे. मात्र अजूनही प्रत्येक राज्यातून दररोज कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकाच दिवसात तब्बल 102 सकारात्मक घटनांसह, तामिळनाडू 411 रुग्णांसह भारताच्या कोरोना व्हायरस चार्टवर दुसर्‍या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूची सर्वात जास्त जवळजवळ 500 रुग्ण आढळून आले आहेत. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले आहे की, देशातील कोरोना व्हायरसच्या जवळपास 30 टक्के घटना या दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील तबलीघी जमातच्या (Nizamuddin Tablighi Jamaat) कार्यक्रमाशी संबंधित आहेत.

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली, यामध्ये देशातील कोरोना व्हायरसच्या परिस्थिती बाबत माहिती देण्यात आली. मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सध्या 17 राज्यांमधून एकूण 1023 कोरोना व्हायरसची प्रकरणे ही तबलीगी जमातशी संबंधित आहेत. आता पर्यटक व्हिसावर भारतात येऊन तबलीगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या 960 परदेशी लोकांबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयाने त्वरित हद्दपारीचा निर्णय घेतला आहे.

तबलीगी जमातशी संबंधित प्रकरणे तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, जम्मू काश्मीर, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार, उत्तराखंड, हिमाचल, झारखंड या 17 राज्यांमधून समोर आली आहेत. तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सामील झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या 23 हजार लोकांना अलग ठेवण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे. (हेही वाचा: जाणून घ्या भारतातील लॉक डाऊनचा प्रदूषणावर काय झाला परिणाम; दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच उद्भवली ‘ही’ परिस्थिती)

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोनाचे 2,902 रुग्ण आढळले आहेत. कालपासून 601 पॉझिटिव्ह रूग्ण नोंदवले गेले आहेत, तर काल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृत्यूची संख्या 68 वर पोहोचली आहे.

कोरोना विषाणू बाधित रुग्णांचे वयोगट -

दरम्यान, रुग्णांच्या वयाबद्दल माहिती देताना आरोग्य सचिवांनी सांगितले, 'कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्यांपैकी नऊ टक्के रुग्ण 0-20 वयोगटातील आहेत, 42 टक्के रुग्ण 21-40 वयोगटातील आहेत, 33 टक्के रुग्ण 41-60 वयोगटातील आणि 17 टक्के रुग्ण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.