
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) सहयोगी संघटना स्वदेशी जागरण मंचातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे टिक टॉक (Tik Tok) आणि हेलो (Helo) या प्रसिद्ध मोबाईल ऍप्स विरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या संघटनेच्या दाव्यानुसार, कथित ऍप्सवरून देशद्रोहाला (Anti- National) चालना दिली जात असल्याचे म्हंटले होते. यावर आता केंद्र सरकारने या ऍप्सना कारणे दाखवा नोटीस बजावली असून यामध्ये सरकारने विचारलेल्या 21 प्रश्नांची उत्तरे न दिल्यास या ऍप्सवर पूर्णतः बंदी (Ban) आणण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार,मंत्रालयाने टिक टॉक व हेलो ला ऍप्सवरील भारतीय वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती भविष्यात कोणत्याही विदेशी कंपनी, खाजगी संस्था किंवा तृतीय पक्षाला पुरवली जाणार नाही अशी हमी देण्यास सांगितले आहे, तसेच ऍपवरून खोट्या बातमीला रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि यासंबंधित भारतीय नियमाचे पालन करत असल्याचा पुरावाही मागण्यात आला आहे. संबंधित नोटीसद्वारे, मंत्रालयाने टिक टॉक आणि हेलोवर वापरकर्त्यांसाठी असलेल्या वयाच्या अटीवर प्रश्न केला आहे. भारतीय कायद्यानुसार, देशात 18 वर्षावरील व्यक्तीला प्रौढ मानले जात असताना या ऍप वर वयाची मर्यदा केवळ 13 का ठेवण्यात आली? असा सवाल केला आहे.
काय होती तक्रार?
स्वदेशी जागरण मंचाच्या सहसंचालक, अश्विनी महाजन यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात, टिक टॉक व हेलो विरुद्ध तक्रार केली होती, या ऍप्समधून भारतीय तरुणांना चुकीचा मार्ग दाखवला जात आहे असे म्हणत त्यांनी ही ऍप्लिकेशन्स म्हणजे देशद्रोही विचारणा प्रेमानं देणारा अड्डा बनला आहे असा आरोप लावला होता.
दरम्यान, याप्रकरणी टिक टॉक आणि हेलो ने या तक्ररीमुळे आपल्याला सरकार सोबत मिळून आपलं काम योग्यरितीने करण्यास मदत होईल असे म्हंटले आहे तसेच भारतात आपल्या कंपनीचा योग्य प्रसार होण्याकरिता सरकारकडून पाठिंबा मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.