TikTok App (Photo Credits- Twitter)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) सहयोगी संघटना स्वदेशी जागरण मंचाने काही दिवसांपूर्वी केलेल्या तक्रारीनुसार केंद्र सरकारतर्फे टिक टॉक (Tik Tok) व हेलो (Helo)  या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली होती, सरकारच्या 21 प्रश्नांची उत्तरे न दिल्यास या ऍपवर पूर्णपणे बंदी आणण्याची तंबी देखील देण्यात आली होती. यानंतर आता टिक टॉक ने आपल्या ऍपवरून तब्बल 60 लाखाहून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ (Offensive Tik Tok Video)  काढून टाकल्याचे समजत आहे.

स्वदेशी जागरण मंचाच्या सहसंचालक, अश्विनी महाजन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यात, टिक टॉक व हेलो विरुद्ध तक्रार केली होती, या ऍप्समधून भारतीय तरुणांना चुकीचा मार्ग दाखवला जात आहे असे म्हणत त्यांनी ही ऍप्लिकेशन्स म्हणजे देशद्रोही विचारणा प्रेमानं देणारा अड्डा बनला आहे असा आरोप लावला होता. यावर उत्तर देताना टिक टॉक या मूळच्या चिनी कंपनीचे भारतातील संचालक सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉक हे आपल्या युजर्सना टॅलेंट दाखवण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देते, यामध्ये देशद्रोह किंवा अन्य नकारात्मक भावनांना प्रोत्साहन देण्याचा काहीच हेतू नाहीये, तसेच टिक टॉक वरून मत मांडण्यासाठी सुद्धा बरंच सुरक्षित वातावरण तयार केलं आहे असेही सचिन यांनी स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये तबरेज अंसारीच्या हत्येचा उल्लेख करत जर उद्या त्याच्या मुलाने बदला घेतला तर प्रत्येक मुसलमान दहशतवादी असतो असं म्हणू नका असं सांगणारा एका व्हिडिओ टिक टॉक वरून अल्पावधीतच व्हायरल झाला होता.त्यानंतर मुंबई पोलिसांनीया व्हिडिओमधील 5 जणांवर कारवाई सुद्धा केली होती हाच वाद वाढल्याने पुढे ही तक्रार केली गेली असे म्हंटले जात आहे. दरम्यान या आधी सुद्धा टिक टॉक वरून अश्लील व्हिडीओ बनवले जात असल्याचे सांगून भारतात या ऍप ला काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती, तेव्हापासून सतत काही ना काही कारणांवरून ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहे.