Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

देशात अनेक ठिकाणी हिवाळ्याची सुरुवात झाली आहे. अशा या गुलाबी थंडीत वाइन आणि बिअर (Wine And Beer) पिणाऱ्या लोकांसाठी एका आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत इंग्रजी दारूपैकी वाइन आणि बीअरवर तब्बल 25 टक्के सवलत मिळणार आहे. चक्क एका मोठ्या सेलचे आयोजन करून वाईन आणि बिअरची विक्री केली जाणार आहे. हा निर्णय मोफत वीज आणि पाणीपुरवठा करणाऱ्या दिल्ली सरकारच्या (Delhi Government) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जाहीर केला आहे. म्हणजेच चक्क सरकारतर्फे हा सेल लावण्यात येणार आहे. न्यूज 18 ने याबाबत वृत्त दिले आहे.

या गोष्टीची प्रक्रिया सुरळीत पार पडली तर लवकरच दिल्लीच्या आठ भागात या दारूची विक्री सुरू होईल. हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर उत्पादन शुल्क विभागाने कर न भरता विक्रीसाठी जात असलेल्या अवैध दारूचा फार मोठा साठा जप्त केला आहे. जोपर्यंत या दारू प्रकरणांचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ही दारू सरकारी गोदामांमध्ये सुरक्षित ठेवली जाते. परंतु प्रकरण संपताच ती सरकारी यंत्रणेच्या देखरेखीखाली नष्ट केली जाते. पण, ही दारू नष्ट करण्याऐवजी दिल्ली सरकार आता ती बाजारात विकणार आहे, तेही बाजारभावापेक्षा 25 टक्के स्वस्त.

अशाप्रकारे अवैध दारूच्या विक्रीतून दिल्ली सरकार पैसा उभा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाला तस्करी केलेली दारू विक्रीस वित्त विभागाकडून परवानगी मिळाली आहे. दारू विक्री करण्यापूर्वी दारू विकण्यास योग्य आहे की नाही याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. दिल्ली महानगरपालिकाच्या चार भागात प्रत्येकी दोन दुकानांतून ही दारू विक्री केली जाईल अशी सरकारची योजना आहे. (हेही वाचा: पुणे: Dry Day दिवशी 'ऑनलाईन' दारू मागवणं पडलं महागात; तरूणाने 'या' चूकीमुळे गमावले 50 हजार 778 रुपये)

दिल्ली सरकार केवळ तस्करी करण्यात आलेली इंग्रजी दारू, विदेशी मद्य आणि बिअरची विक्री करणार आहे. तस्करी होणारी देशी दारू विकली जाणार नाही. जप्त केलेली दारू 25 टक्के कमी दराने विकली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार ही पकडलेली दारू हरियाणाची आहे. हरियाणामध्ये या बाटलीची साधारण किंमत 500 रुपये आहे, तर आता ती दिल्लीत 25 टक्के कमी दराने विकली जाईल. म्हणजेच एका बाटलीचा दिल्लीतीत दर 375 रुपये असेल.