Thief | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

TGB: चोरीच्या प्रयत्नात अपयश आल्याने चोराने चक्क बँकेचे कौतुक केले आहे. तो केवळ कौतुक करुन थांबला नाही तर त्याने चक्क बँकेला प्रशिस्तीपत्रकच दिले आहे. वाचायला आणि ऐकायला काहीशी विचित्र वाटणारी ही घटना खरोखरच प्रत्यक्षात घडली आहे. त्याचे झाले असे तेलंगणा ग्रामीण बँकेत (Telangana Grameena Bank) एक चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने गेला. परंतू, त्याला अनेक प्रयत्न करुन चोरी करण्यासाठी आवश्यक असा पैसे आणि इतर ऐवज काही मिळाला नाही. त्यामुळे त्याला रिकाम्या हाताने परतावे लागले खरे. पण जाताजाता त्याने 'बँकेची सुरक्षा व्यवस्था अत्यंत चांगली आहे' असे पत्र लिहून ठेवले. त्यामुळे या अनोख्या चोरट्याची सध्या परिसरात चर्चा आहे.

चोराने बँक व्यवस्थापनासाठी लिहीलेली नोटही मजेशी आहे. त्याने त्यात म्हटले आहे की, ही बँक खरोखरच चांगली आहे. मी चोरीच्या उद्देशाने येथे आलो. पण येथे मला काहीच आढळले नाही. मी एकाही रुपयाची चोरी करु शकलो नाही. इतकेच नव्हे तर तुमची बँक सुरक्षेला किती महत्त्व देते हेही समजले. मला चोरण्यासारखे काहीच आढळले नाही. त्यामुळे तुम्हाला माझ्या बोटांचे ठसे आढळून येणार नाहीत. मला शोधू नका. पकडण्याचा प्रयत्नही करु नका कारण तुमचे काहीच गेले नाही.

तेंलंगणा राज्यात ही घटना गुरुवारी (31 ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे इंडिया टुडेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी बँकेचा कर्मचारी वर्ग नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाला असता बँकेत चोरीसदृश्य घटना घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी मग सावध होत फआरशी हालचाल करता आपला मोर्चा सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे वळवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक इसम संशयास्पदरित्या बँकेत वावरताना दिसतो आहे. त्याने चेहऱ्यावर मुखवटा लावल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. हा चोर कोणीतरी स्थानिक व्यक्तीच असावा असा बँकेला संशय आहे. दरम्यान, त्याने लिहीलेली एक नोट कर्मचाऱ्यांच्या हाती लागली. बँकेने सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरु आहे. मात्र, या हटके चोरट्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.