अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत, उत्तर रेल्वेच्या (Northern Railway) अंबाला विभागाचे (Ambala Division) उप तिकीट निरीक्षक सिमरनजीत सिंग वालिया (Simranjeet Singh Walia) यांनी गेल्या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेच्या तिकीट तपासनीसांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. वालिया यांनी 2022-2023 या वर्षात 36,667 प्रवाशांकडून तब्बल 2.25 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी किंवा बुक न केलेले सामान घेऊन जात असलेल्या लोकांचा समावेश आहे. वालिया यांच्यानंतर मध्य रेल्वेचे धर्मेंद्र कुमार यांचा नंबर लागतो. धर्मेंद्र कुमार यांनी गेल्या आर्थिक वर्षात 22,996 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 2.12 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
उत्तर रेल्वेसाठी ही ऐतिहासिक कामगिरी आहे कारण वैयक्तिक तिकीट तपासणी कर्मचार्यांनी तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वालिया यांनी सरासरी दिवसाला 122 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल केला आहे. हे गृहीत धरले तर, त्यांनी गेल्या वर्षी साप्ताहिक सुट्टी आणि इतर सुट्ट्या सोडून सुमारे 300 दिवस काम केले आहे. (हेही वाचा: बंगळुरू येथे FASTag वर 10 रुपये जादा आकारले, NHAI ला कोर्टात खेचले, भरपाई म्हणून द्यावे लागले 8000 रुपये)
संदर्भासाठी, सरासरी तिकीट तपासनीस दिवसाला आठ तिकीट नसलेल्या प्रवाशांना दंड आकारतो आणि सुमारे 2,000 रुपये दंड वसूल करतो, जे वार्षिक 6.3 लाख रुपये इतके आहे. तिकीट तपासनीसचा एकूण पगार ज्येष्ठतेनुसार दरमहा 45,000 रुपये ते 80,000 रुपयांपर्यंत असतो.
उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक संजय कुमार जैन यांनी वालिया यांच्या या कामगिरीबद्दल आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. तिकिटविरहित आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी संपूर्ण शाखेचे अभिनंदन केले. जैन यांनी सर्व रेल्वे प्रवाशांना वैध रेल्वे तिकीट आणि ट्रॅव्हल ऑथॉरिटीसह प्रवास करण्याचे आवाहन केले.