SUV Falls Into Pond In Chhattisgarh: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील बलरामपूर जिल्ह्यात (Balrampur District) शनिवारी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) तलावात पडल्याने एक महिला आणि एका मुलीसह सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात (Accident) आणखी एक जण जखमी झाला आहे. बलरामपूरच्या राजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधा बगिचा मुख्य रस्त्यावरील लाडुआ वळणावर शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडी तलावात पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
बलरामपूर जिल्ह्यातील लारीमा गावातील रहिवासी वाहनाने शेजारच्या सूरजपूर जिल्ह्यात जात असताना ही घटना घडली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसयूव्ही जेव्हा लाडुआ वळणावर पोहोचली तेव्हा ती नियंत्रणाबाहेर गेली आणि तलावात पडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. (हेही वाचा - Pune Road Accident: पुण्यात भरधाव कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू)
दरम्यान, गाडीत प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तथापी, पोलिसांनी जखमी चालकाला वाचवले. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेसीबी मशिनच्या सहाय्याने वाहन तलावातून बाहेर काढण्यात आले. या अपघातातील मृतांची ओळख पटवली जात आहे. (हेही वाचा -Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दरीत कोसळली कार; 10 महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू)
तलावात बुडालेली वाहन पोलीस व स्थानिक लोकांनी जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले. यानंतर राजपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. अपघातानंतर वाहनाचे दरवाजे लॉक झाले होते, त्यामुळे लोकांना बाहेर पडता आले नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व कुस्मी परिसरातील लारीमा येथून सुरजपूरला जात होते. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे.