BJP MLA Surendra Singh: मुलींवर चांगले संस्कार करा, बलात्कार थांबतील- भाजप आमदार
Surendra Singh, BJP MLA | (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार (Hathras Gang Rape) प्रकरणावरुन देशभरात संतप्त भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी मागणी देशभरातून होत असतानाच भाजप आमदार (BJP MLA) सुरेंद्र सिंह (Surendra Singh) यांनी मात्र बलात्कार थांबविण्यासाठी भलताच सल्ला दिला आहे. सुरेंद्र सिंह सांगतात की, बलात्कार थांबवायचे असतील तर कुटुंबीयांनी मुलींनाच चांगले संस्कार द्यायला पाहिजेत. सुरेंद्र सिंह हे एनआय या वृत्तवासंस्थेशी बोलत होते. सुरेंद्र सिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'जर बलात्कार थांबवायचे असतीलत तर प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे की, त्यांनी आपल्या मुलींना योग्य संस्कार द्यावेत.गुन्हेगारीला पायबंद घालने हे सरकारचे काम आहे. परंतू केवळ कायदा करुन अथवा गुन्हेगारांना शिक्षा देऊन बलात्कार थांबवता येऊ शकत नाहीत. खरोखरच जर बलात्कार थांबवायचे असतील तर त्यासाठी आई-वडीलांनी आपल्या मुलींना शालीन आणि सुसंस्कारी बनवणे गरजेचे आहे. सुरेंद्र सिंह यांनी आपण आमदार आहोत. परंतू, त्यासोबतच मी शिक्षक देखील आहे, अशी पुस्तीही जोडली.

दरम्यान, उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे सामूहिक बलात्काराची घटना घडली. त्यामुळे देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली. या घटनेला काही दिवसही उलटत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेशातीलच बलरामपूर येथेही पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली. उत्तर प्रदेशमधील अलिगड येथून आजच पुन्हा वृत्त आले आहे की, येथे एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलीवर तिच्या नातेवाईकांनीच बलात्कार केल्याची माहिती पुढे येत आहे. (हेही वाचा, Uttar Pradesh: अलीगढ येथे 4 वर्षांच्या मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार; पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु)

दरम्यान, हाथरस प्रकरणावरुन देभरात राजकीय वातावरण तापले आहे. हाथरस प्रकरणातील पीडितेचा मृतदेह उत्तरप्रदेश पोलिसांनी पेट्रोल ओतून जाळला. हा मृतदेह जाळत असताना तिचे कुटुंबीयही सोबत नव्हते. प्रसारमाध्यमांनाही या परिसरात यायला मनाई करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून सुरुवातीला मनाई करण्यात आली. या सर्व घटना पाहता उत्तर प्रदेश पोलीस नेमके काय लपवत आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.