
मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल, ज्यामध्ये संजय दत्त कानात ब्लूटूथ (Bluetooth) लावून परीक्षा देतो असे दाखवण्यात आले आहे. तो एक चित्रपट होता मात्र आता ही गोष्ट खरोखर घडली आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदोरच्या एमजीएम कॉलेजमध्ये अंतिम वर्षाची वैद्यकीय परीक्षा सुरू होती. यावेळी देवी अहिल्या विद्यापीठाचे तपास पथक परीक्षा केंद्रावर पोहोचले. तपासादरम्यान एका विद्यार्थ्याच्या खिशात एक फोन आढळून आला. तपास पथकाने विद्यार्थ्याच्या खिशातून फोन काढला तेव्हा फोन सुरू होता. फोनमध्ये ब्लूटूथही सुरू असल्याचे तपास पथकाने पाहिले.
फोनमध्ये ब्लूटूथ जोडलेले पाहून तपास पथकाला संशय आला. मात्र यानंतर विद्यार्थ्याने जो खुलासा केला तो ऐकून केंद्रावर उपस्थित सर्वांचेच धाबे दणाणले. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्जनच्या मदतीने कानावर ईएनटी शस्त्रक्रिया केल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. या विद्यार्थ्याने शस्त्रक्रिया करून कानात ब्लूटूथ लावले होते आणि त्याद्वारे तो कॉपी करणार होता.
त्याच केंद्रावर दुसरा विद्यार्थी कॉपी करत होता. विद्यार्थ्याने त्याच्या बनियानमध्ये चिप लपवली होती, ज्यामध्ये सिमकार्ड जोडलेले होते. विद्यार्थ्याने बनियानला चिप वायर शिवली होती. कॉपी करण्याच्या या पद्धती पाहून घटनास्थळी उपस्थित लोक थक्क झाले. दोन्ही विद्यार्थ्यांवर कॉपीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांची तक्रार कॉपी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. (हेही वाचा: UP Election: लखमीपुर येथे EVM मशीनमध्ये टाकले फेविक्विक, सपा पक्षाचे बटण दाबले जात नसल्याची EC अधिकाऱ्यांकडे तक्रार)
दुसरीकडे, मंगळवारी मध्य प्रदेश बोर्डाचा दहावीचा गणिताचा पेपर होता. यादरम्यान भोपाळच्या संत हिरडाराम नगर येथील बॉईज हायर सेकेंडरी स्कूलमध्ये एक विद्यार्थी पेपर देत होता. या विद्यार्थ्याने कानात ब्लूटूथ लावले होते आणि त्याद्वारे तो कॉपी करत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थ्याने अंडरगारमेंटमध्ये आपला मोबाइल आणि स्मार्ट घड्याळ लपवले होते. विभागीय संचालक सार्वजनिक शिक्षण राजीव सिंह तोमर यांनी सांगितले की, विद्यार्थ्याचे नाव साजिद आहे आणि तो खाजगी उमेदवार म्हणून परीक्षा देण्यासाठी आला होता.