लोकसभेत 350 खासदार असलेलं सरकार श्रीरामाला हक्काचं छप्पर देऊ शकत नाही?- शिवसेना
(संग्रहित, संपादित प्रतिमा)

मुंबई 18 जून: अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) राममंदिरांची बांधणी या बहुचर्चित विषयात सरकारने हातपाय हलवण्याची गरज आहे असं म्हणत शिवसेनेने (Shivsena)  पुन्हा एकदा केंद्र सरकारला साद घातली आहे. अलीकडेच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी पक्षातील 18 खासदारांच्या सोबत अयोध्या दौरा करत श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राम मंदिर बनणारच असा ठाम विश्वास दर्शवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामना मधून त्यांनी राम मंदिराची मागणी केली आहे. लोकसभा (Lok Sabha)  निवडणूक निकालात एनडीएला 350 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत यामध्ये श्रीरामाचा आशीर्वाद आहे, ज्यांनी राम मंदिराच्या बांधणीला विरोध केला त्यांचा दारुण पराभव झाला , हा संकेत ओळखून आता सरकारने स्वतःच मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असा युक्तिवाद सामना मधील अग्रलेखात करण्यात आला आहे.

ANI ट्विट

अग्रलेखातील माहितीनुसार, राम मंदिरासाठी खरतर सरकारपुढे दोनच मार्ग उपलब्ध आहेत, एकतर त्यांनी मुस्लिम संघटनांशी संवाद साधावा अन्यथा सुप्रीम कोर्टाच्या प्रक्रियेतून पुढे जावे. वास्तविक दृष्ट्या हे दोन्ही मार्ग कठीण आहेत, मुस्लिम संघटनांशी संवादाचा पर्याय वापरून काही उपयोग नाहीच तर कोर्टाच्या कारवाईत खूप वेळ जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदाचा मान ठेवून मंदिरासाठी कायदेशीर कारवाईचा मार्ग उचित असल्याचे म्हणतात पण ते स्वतः उघड हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असल्याने लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. या विश्वासाचा प्रत्यय लोकसभेतील विजयातून दिसून येतोच. त्यामुळे सरकारने आता अधिक विलंब न करता या कामात गती आणण्याची गरज आहे.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी अयोध्येचा दौरा केला त्यावेळी सुद्धा त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेने केलेल्या "पहले मंदिर फार सरकार" मागणीची आठवण करून दिली. केंद्रात मोदी व उत्तर प्रदेशात योगी यांची सत्ता आणून लोकांनी आपला विश्वास दर्शवला आहे त्यामुळे आता राम मंदिराच्या बांधणीला विलंब होणे उचित नाही असे देखिल उद्धव यांनी म्हंटले आहे.