Sharad Pawar Likely to lead UPA: शरद पवार करणार संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व? राष्ट्रवादीने दिले स्पष्टीकरण, शिवसेना काय म्हणतीय पाहा
UPA | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

संयुक्त पुरोगामी आघाडीचे (United Progressive Alliance) नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawa) यांच्याकडे जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून अचानक झळकले. प्रसारमाध्यमांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लागलीच स्पष्टीकरण देत प्रसारमाध्यमांतील वृत्ताचे खंडण केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा मित्र असलेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्षानेही सावध प्रतिक्रिया देत राजकीय मत व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेस पक्षाने मात्र या वृत्ताबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

शरद पवार यांच्याबाबत प्रसारमाध्यमांनी केलेल्या दावाचे खंडण करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले की, कोणतीही शाहनिशा न करता प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे वृत्त दिले. परंतू, शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करण्याबबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्यापतरी नाही, असे तपासे यांनी सांगितले. तसेच, देशात आज शेतकरी आक्रमक आहेत. आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनावरुन जनतेचे लक्ष हटविण्यासाठीच कोणीतरी अशा प्रकारची बातमी पेरली असावी, अशी टीकाही तपासे यांनी या वेळी केली. (हेही वाचा, Shiv Sena Decision Regarding Local Body Elections: ही दोस्ती तुटायची नाय, स्वराज्य संस्था निवडणूक लढण्याबाबत शिवसेना नेतृत्वाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्र आणि महाविकाआघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेबाबत विचारले असता खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. देशातील कृषी आणि इतर अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणात आणि जनमानसात लोकांची नाडी ओळखणे, विविध प्रश्न, समस्या यांचे आकलन करणे या सर्व गोष्टी पवार यांच्याकडे आहेत. त्यांचा अनुभवही प्रचंड मोठा आहे. त्यामुळे ते देशाचे नेतृत्व करु शकतात.

दरम्यान, शरद पवार हे युपीएचे नेतृत्व करु शकतात का याबाबत विचारले असता, त्याबाबत आपण बोलणार नाही. शिवसेना हा युपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे आपण याबाबत भाष्य करणार नसल्याचे राऊत यांनी या वेळी सांगितले.

पवार युपीए अध्यक्ष झाल्या आनंदच

पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष झाल्यास आम्हाला आनंद होईल. परंतु मी ऐकले आहे की त्यांनी ते वैयक्तिकपणे नाकारले आहे. परंतू असा प्रस्ताव अधिकृतपणे समोर आला तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. कॉंग्रेस आता कमकुवत आहे म्हणून विरोधी पक्षांनी एकत्र येऊन युपीएला बळकट करण्याची गरज आहे.