Shiv Sena Decision Regarding Local Body Elections: ही दोस्ती तुटायची नाय,  स्वराज्य संस्था निवडणूक लढण्याबाबत शिवसेना नेतृत्वाचा महत्त्वपूर्ण निर्णय
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

राज्यात पार पडणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ( Local Body Elections) मित्रपक्षांसोबत लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (Shiv Sena) मंत्र्यांची एक बैठक काल सायंकाळी पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूका महाविकासआघाडीतील घटक पक्षांसोबत लढण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीनंतर राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आगामी काळात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाक महाविकासआघाडीतील घटक पक्षांसोबत एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेशही या वेळी दिल्याचे, सत्तार यांनी सांगितले.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीस शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी यापुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली. एकत्र लढल्यामुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठे यश मिळाल्याचे सत्तार यांनी सांगितले. (हेही वाचा, Rohit Pawar Slams BJP: 'त्या' पत्रावरुन शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपला रोहीत पवार यांचे प्रत्युत्तर)

कोरोना व्हायरस संकट काळात पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुका आता होऊ लागल्या आहेत. यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रमाण मोठे असणार आहे. पदवीधर निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीतही आपली पिछेहाट होऊ नये यासाठी भाजप कार्यरत झाला आहे. तर भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकासआघाडीच्या रुपाने एकत्र आल आहेत.