युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झाले असून भाजपा पाठिंबा देण्यावरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) आपल्या आजोबांसाठी मैदानात उतरले आहेत. तसेच भाजपच्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसादजी यांनी कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारचा बचाव करण्यासाठी पवार साहेबांनी शिवराज सिंग चव्हाण जी तसेच स्व. शीला दीक्षित जी यांना लिहिलेल्या तत्कालीन पत्रांचा दाखला दिला आहे. या पत्राचा संदर्भ देताना पत्राचा पहिला परिच्छेद वाचला जात आहे, परंतु पत्राचा पुढील भाग मात्र टाळला जात आहे. पत्र पूर्ण वाचले असते तर कदाचित ते पत्र कुठल्या कायद्याच्या संदर्भात लिहिले गेले आहे ते देखील कळले असते, आणि 2007 च्या मसुद्याचा नियमांचा अभ्यास केला असता तर कदाचित शेतकरी आंदोलन का करीत आहे? आणि त्यांच्या मागण्या काय आहेत? हे देखील समजले असते. केलेले कायदे बरोबरच आहेत, चुकीचे नाहीत, मागे घेण्याचा प्रश्नच नाही हा केंद्र सरकारनं आपला इगो बाजूला ठेवायला हवा आणि विरोध कशासाठी हे समजून त्यावर उपाय काढायला हवा, अशा आशयाची रोहीत पवार यांनी फेसबूकवर पोस्ट केली आहे. हे देखील वाचा- Sharad Pawar Gets Angry: शरद पवार पत्रकारांवर चिडले, म्हणाले 'तुम्ही माझा वेळ वाया घालवता आहात'
रोहित पवार यांची फेसबूक पोस्ट-
सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे पत्र व्हायरल झाले आहे. यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ज्या लोकांनी या पत्राचा हवाला दिला आहे, त्यांनी हे पत्र व्यवस्थित वाचले असते तर त्यांचा वेळ वाचला असता. या पत्रात कायद्यातील सुधारणांसंदर्भात लिहण्यात आले होते. परंतु, केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यात याचा उल्लेख नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.