Sharad Pawar Gets Angry: शरद पवार पत्रकारांवर चिडले, म्हणाले 'तुम्ही माझा वेळ वाया घालवता आहात'
Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज पत्रकारांवर काहीसे चिडताना दिसले. ते पत्रकारांवर चिडले (Sharad Pawar Got Angry On Journalist) आणि नाराज होऊन त्यांनी पत्रकार परिषदही संपवली. शरद पवार हे शक्यतो कोणताही प्रश्न सहजासहजी टाळत नाही. पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देतात. परंतू आज काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे पवार यांच्या कृतीची चर्चा होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. शरद पवार या भेटीबाबत पत्रकारांना माहिती देत होते. या वेळी शरद पवार यांनी सांगितले की, पुणे विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यग्र असलेले विमानतळ आहे. त्यामुळे पुणे विमानतळावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे पुण्यात आणखी एका विमानतळाची आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहणासंदर्भात या भेटीत चर्चा झाली. या शिवाय इतर कोणत्याही विषयावर या भेटीत चर्चा झाली नाही, असे पवार यांनी सांगितले.

काय घडले?

दरम्यान, काही पत्रकारांनी कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलन याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावर पवार यांनी सांगितले की, आज मी कृषी या विषयावर बोलणार नाही. राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेली भेट ही वेगळ्या कारणासाठी होती. तरीही पत्रकारांनी शरद पावर यांना ते कृषीमंत्री असताना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले. (हेही वाचा, Sanjay Raut On Bharat Bandh: भारत बंदला जगभरातून पाठिंबा- संजय राऊत)

दरम्यान, शरद पवार यांनी स्पष्ट केले की, संबंधित पत्राबाबत आगोदरच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आपण पत्र निट वाचा. यावर पुन्हा पत्रकारांनी तोच प्रश्न ताणला असता शरद पवार यांवी सांगितले आज मी कृषी या विषयावर बोलत नाही. आपण मझा वेळ वाया घालवू नका. तरीही पत्रकारांनी पुन्हा ते पत्र आणि शेती यावरच विचारणा केली असता शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत पत्रकार परिषदेतून बाहेर पडणे पसंद केले.